Tamil Nadu Result 2026: सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तमिळनाडू निवडणुकीचा निकाल फारच आश्चर्यकारक लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने जोरदार मुसंडी मारत एम. के. स्टॅलिन यांना जोरदार धक्का दिला आहे. अनपेक्षित पराभवामुळे भावनिक झालेल्या स्टॅलिन यांनी, जनतेचा कौल नम्रपणे स्वीकारतो, अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही तामिळनाडूचा सर्वच क्षेत्रांत विकास केला. निवडणुकीच्या रिंगणात उतरताना आम्ही केवळ आमच्या कामाच्या जोरावर मते मागितली होती”, असेही स्टॅलिन म्हणाले.
टीव्हीके सर्वात मोठा पक्ष
तमिळनाडूच्या निवडणुकीत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने शंभरहून अधिक जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय केला आहे. तर, डीएमकेला ६० आणि एडीएमकेला ४७ जागांपर्यंत मजल मारता आली. तमिळनाडूत काँग्रेसची जादू चालली नसल्याचे या निकालात दिसून आले. बहुतांश एक्झिट पोल्समध्ये डीएमके यांच्या बाजूने कल देण्यात आले होते तर, अॅक्सिस माय इंडिया वगळता थलपती यांच्या पक्षाला शंभरहून अधिक जागा मिळतील असा अंदाज कोणत्याच संस्थेने वर्तवला नव्हता. पण, निकालानंतर बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाल्यानंतर स्टॅलिन यांनी जनतेचा कौल स्वीकारला आहे.
स्टॅलिन यांनी स्वीकारला पराभव
विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत स्टॅलिन यांनी जनतेचा कौल नम्रपणे स्वीकारत असल्याचे स्पष्ट केले. गेल्या पाच वर्षांत आम्ही अनेक प्रकल्प राबवले आणि तामिळनाडूच्या जनतेला सुशासन दिले. आम्ही तामिळनाडूचा सर्वच क्षेत्रांत विकास केला. निवडणुकीच्या रिंगणात उतरताना आम्ही केवळ आमच्या कामाच्या जोरावर मते मागितली होती. आम्ही जनतेसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजना भविष्यातही अखंड सुरू राहाव्यात, याच उद्देशाने आम्ही मतदारांना साद घातली होती, असे स्टॅलिन यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

स्टॅलिन यांची पोस्ट
“द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) च्या नेतृत्वाखालील ‘धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडी’वर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या तामिळनाडूतील तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानतो. मला मतदान करणाऱ्यांसाठीच नाही, तर ज्यांनी मतदान केले नाही त्यांच्यासाठीही मी निष्ठेने काम केले. मी सर्व जनतेशी प्रामाणिक राहिलो आहे. मी माझ्या क्षमतेपलीकडे जाऊन कष्ट घेतले आहेत. ज्यांनी माझ्याप्रमाणेच मैदानात उतरून कठोर परिश्रम घेतले, अशा माझ्या नेत्या करुणानिधींच्या प्रिय कार्यकर्त्यांना आणि माझ्या आत्म्याशी जोडल्या गेलेल्या सहकाऱ्यांना माझे मनःपूर्वक धन्यवाद”, अशा शब्दात त्यांनी सहकाऱ्यांचे आभार मानले.
विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणार
“स्टॅलिन यांनी मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचेही मानले. माझ्या राजकीय प्रवासात मी अनेक मोठे विजय पाहिले आहेत आणि पराभवही स्वीकारले आहेत. हार-जीत पेक्षा आपली तत्त्वे आणि ध्येयधोरणे अधिक महत्त्वाची आहेत, हे समजून चालणारा मी एक कार्यकर्ता आहे. द्रविड मुन्नेत्र कळघमचा राजकीय प्रवास न डगमगता असाच सुरू राहील. आतापर्यंत जनतेसाठी एक आदर्श सत्ताधारी पक्ष म्हणून काम करणारा डीएमके, यापुढे एक आदर्श विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडेल”, असेही स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.
