MK Stalin defends CM Vijay’s ’10 lakh crore debt’ allegation : राज्य आर्थिक संकटात असल्याचं आज तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी सांगितलं. मात्र, त्यांचा हा दावा तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी फेटाळून लावला आहे. तामिळनाडूचे कर्ज स्वीकारार्ह मर्यादेत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
एक्सवरील पोस्टमध्ये स्टॅलिन म्हणाले, सरकारी तिजोरी रिकामी असल्याचा दावा करून त्यांना मतदान केलेल्या लोकांची निराशा करून आपल्या कार्यकाळाची सुरुवात करायची आहे. “विजयी टीव्हीकेचे नेते विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठित भूमिका स्वीकारली. त्यांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. पदभार स्वीकारताच तुम्ही स्वाक्षरी केलेल्या घोषणांचेही मी स्वागत करतो”, असंही ते म्हणाले.
पैसा उपलब्ध, द्यायची दानत हवी
ते पुढे म्हणाले, सरकारकडे पैसा नाही, असे लगेचच म्हणायला सुरुवात करू नका. सगळा पैसा उपलब्ध आहे. गरज आहे ती तो लोकांना देण्याच्या इच्छाशक्तीची आणि शासन करण्याच्या क्षमतेची.” कोविड, पूर आणि भाजपाप्रणीत केंद्र सराकरकडून झालेली उपेक्षा यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतानाही त्यांच्या सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
तमिळनाडूतील कर्ज मर्यादेतच
गेल्या सरकारने १० लाख कोटी रुपयांचं कर्ज मागे ठेवले असून पद सोडण्यापूर्वी सरकारी तिजोरी रिकामी केली असल्याचा आरोप तुम्ही तुमच्या पहिल्या भाषणात केलात. यावर स्टॅलिन म्हणाले, “तामिळनाडूची कर्ज पातळी परवानगी असलेल्या मर्यादेच्या आत आहे. “
पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे सरकार राज्याच्या आर्थिक व्यवहारांवर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करू शकते, अशी घोषणा विजय यांनी केल्यानंतर ही टिप्पणी आली आहे. “सर्व बाबींचा आढावा घेतल्यानतंर मी जनतेसमोर एक श्वेतपत्रिका सादर करणार आहे. माझे सरकार पारदर्शक असावे, अशी माझी इच्छा आहे, असं विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात सांगितलं. जिथपर्यंत तामिळनाडूचा संबंध आहे, मला जर कोणाला भेटायचे असेल तर मी गुप्तपणे किंवा बंद दाराआड करणार नाही. मी जे काही करेन, ते उघडपणे आणि पादर्शकपणे करेन”, असंही त्यांनी म्हटलं.
