“धन्य ते योगीजी आणि धन्य ते मोदीजी”; भाजपा आमदाराच्या मृत्यूनंतर मुलाची उद्विग्न प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशमध्ये करोनाचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत तीन आमदारांचा मृत्यू झालाय

फाइल फोटो (सौजन्य : पीटीआय)

उत्तर प्रदेशमध्ये करोनाचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत तीन आमदारांचा मृत्यू झाला आहे. बरेलीमधील नवाबगंज मतदारसंघाचे भाजपाचे आमदार केसर सिंह गंगवार यांचा नुकताच करोनामुळे मृत्यू झाला. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यावर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी मृत्यूच्या दोन दिवस आधी लिहिलेलं एक पत्र आता व्हायरल होत आहे.

मृत्यूच्या दोन दिवस आधीच केसर यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी मॅक्स रुग्णालयामध्ये आपल्यासाठी बेडची व्यवस्था करावी अशी मागणी केली होती. मात्र या पत्रानंतरही त्यांना मॅक्स रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध झाला नाही. बरेली प्रशासनाने त्यांना नोएडा येथील यथार्थ रुग्णालयामध्येच राहण्यास सांगितलं.

नक्की वाचा >> “…नाहीतर मग करोनामुळे निधन झालेल्यांच्या मृत्यू दाखल्यावरही मोदींचा फोटो लावा”

वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर केसर यांच्या मुलाने आता उत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेविरुद्ध प्रश्न उपस्थित केलाय. “उत्तर प्रदेश सरकारला त्यांच्या पक्षाच्या आमदारावरही नीट उपचार करता येत नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयाला अनेकदा फोन करुनही कोणी फोन उचलत नाही. धन्य आहेत योगीजी आणि धन्य आहेत मोदीजी,” असं केसर यांचा मुलगा विशाल याने ‘आजतक’शी बोलताना म्हटलं आहे.

केसर सिंह हे करोनामुळे मरण पावलेले उत्तर प्रदेशमधील भाजपाचे तिसरे आमदार आहेत. यापूर्वी करोनाच्या दुसऱ्या लाटेत दोन भाजपा आमदारांना प्राण गमावावा लागला आहे. केसर सिंह यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी आपल्या सद्भावना नातेवाईकांसोबत असल्याचं सांगितलं आहे. केसर सिंह यांच्या मृत्यूनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.

केसर सिंह यांच्या आधी औरैयाचे भाजपा आमदार रमेश दिवाकर आणि लखनऊ पश्चिमचे आमदार सुरेश श्रीवास्तव यांचाही करोनाने मृत्यू झाला होता. श्रीवास्तव यांच्या पत्नीचाही करोनामुळे मृत्यू झालाय. मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधितांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड्सची कमतरता असल्याचे व्हिडीओ आणि बातम्या समाजमाध्यमांमधून समोर येत आहेत. असं असतानाही राज्य सरकारकडून राज्यात ऑक्सिजनची कमतरता नसल्याचा दावा केला जातोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mla kesar singh gangwar died due to corona son criticize yogi and modi scsg

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या