कृषी उत्पादनात भरीव वाढ करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा उपयोग होऊ शकतो. देशात दुसरी हरितक्रांती आणण्यातही ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल, या शब्दांत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या योजनेचे शनिवारी समर्थन केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसंबंधीच्या परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. गांधी म्हणाल्या, “ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे कृषी उत्पादनात भरघोस वाढ होईल, यावर माझा विश्वास आहे. या योजनेच्या माध्यमातून गावांमध्ये लहान शेतकऱयांसाठी जलसंधारणाच्या सुविधा पुरविल्या जाऊ शकतात. पडीक जमिनी लागवडयोग्य बनविल्या जाऊ शकतात आणि शेतीकडे शेतकऱयांना आकर्षित केले जाऊ शकते. कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाशी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱयांची सांगड घातल्यास कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ होईल. देशात दुसरी हरितक्रांती आणण्याचे स्वप्न या कायद्यामुळे पूर्ण होऊ शकेल.”
या योजनेची अमलबजावणी हे नक्कीच आव्हान असेल, असे सांगून त्या म्हणाल्या, विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे किंवा निधीचा दुरुपयोग करण्यात आल्याचे आपण नेहमीच ऐकत असतो. त्यामुळे या योजनेच्या अमलबजावणीवर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या योजनेत कोणतीही उणीव राहणार नाही, यासाठी आधुनिक संवाद माध्यमांच्या साह्याने केंद्र सरकार पावले उचलेल, असेही सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले.
परिषदेच्या उदघाटनपर भाषणात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग म्हणाले, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये नव्या ३० कामांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागात शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणे, यालाच केंद्र सरकारचे प्राधान्य आहे.