मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे जानेवारी महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. राज ठाकरे यांनी नाशिकमधल्या सप्तश्रृंगी देवीच्या चरणी अमित आणि मितालीची लग्नपत्रिका ठेवून देवीचे आशीर्वाद घेतले आहे.

अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे २७ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहे. मुंबईतल्या सेंट रेजिस या आलिशान ठिकाणी अमित आणि मितालीचा विवाहसोहळा पार पडणार आहे. गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांचाही साखरपुडा पार पडला. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. मिताली बोरुडेने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. ती प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.  अमित आणि मिताली यांची ओळख जुनी आहे. याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आता ते दोघंही विवाहबंधनात अडकणार आहेत.