मध्य प्रदेशमध्ये इंदोरच्या जवळ कंपेल गावात १०० हून अधिक लोकांच्या जमावाने जय श्रीरामच्या घोषणा देत ७ सदस्यांच्या एका अल्पसंख्याक कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा आरोप झालाय. या जमावाने पीडित कुटुंबाला गाव सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडितांनी केलाय. दुसरीकडे पोलिसांनी हा पैशांवरुन दोन गटात झालेला वाद असल्याचा दावा केलाय. तसेच या प्रकरणी दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्याची माहिती दिलीय. मात्र, पीडितांविरुद्ध दाखल एफआयआर पूर्णपणे खोटी असल्याचा आरोप पीडितांच्या वकिलांनी केलाय. पीडितांवर दबाव आणण्यासाठी हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केलाय.

४६ वर्षीय पीडित व्यक्तीच्या मुलाने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं, “आरोपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत रॉडने मारहाण केली. त्यांनी माझ्या वडिलांना मारहाण केल्यानंतर माझ्या काकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी काकांना देखील मारहाण केली. तसेच आम्ही तुम्हाला घर रिकामं करण्यास सांगितलं होतं, नाहीतर परिणाम भोगा असा इशारा दिल्याची आठवण करून दिली.”

“महिनाभरापूर्वी घर आणि गाव सोडून जाण्यास सांगत धमकी”

“हे लोक एका मागोमाग कारने आले आणि मारहाण केली. मी हा संपूर्ण घटनाक्रम मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी माझा हात पकडून घराबाहेर खेचलं आणि मोबाईल हिसकावत फोडला,” असा आरोप कुटुंबातील महिलेने केलाय. या प्रकरणी पीडित कुटुंबाने पोलीस तक्रार दिली आहे. या जमावाने महिनाभरापूर्वीही धमकी दिली होती आणि याबाबत गावाच्या सरपंचांना माहिती दिल्याचंही पीडित कुटुंबाने म्हटलंय.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील या प्रकरणी ट्विट करत आरोपींवर कारवाईची मागणी केलीय.

पीडित कुटुंबानुसार मारहाणीचं कारण काय?

पीडित कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. त्यामुळे घरासाठी शेजारीच एक जमिनीचा तुकडा विकत घेण्याचं ठरवलं. मात्र, हे आरोपींना आवडलं नाही. आम्ही या जमिनीचा वापर आमच्यासारख्या आणखी लोकांना राहण्यासाठी करु, असा आरोप त्यांनी केला. यानंतर आम्ही ही जमीन घेण्याचं रद्द केलं. मात्र, गावच्या सरपंचांनी ते तरुण रक्त आहे, काही करणार नाही. काळजीचं कारण नाही, असं सांगत हमी दिली.”

पोलिसांनुसार मारहाणीचं कारण काय?

पोलीस उपनिरिक्षक विश्वजीत तोमर म्हणाले, “समोरच्या जमावातील काही लोकांनी गेयासुद्दीन कुटुंबाला ट्रॉली तयार करण्यासाठी काही पैसे दिले होते. मात्र, त्यांनी ते काम पूर्ण केलं नाही आणि पैसेही परत दिले नाही. यावरुनच दोन्ही गटात प्राथमिक वाद झाला. या प्रकरणात दोन्ही बाजूने एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत. या कुटुंबाविरोधात गावातील विकास पटेल यांनी तक्रार दाखल केलीय. दोन्हीकडील लोकांना जखमा झाल्या आहेत. आम्ही या प्रकरणी तपास करत आहोत.”

हेही वाचा : महिलेस गाव गुंडांची मारहाण, तक्रारदारासच पोलिसांचा प्रसाद!

“पीडित कुटुंबाला मारहाण करणाऱ्यांमध्ये केवळ ९ जणांचा सहभाग होता. बाकी लोक घराभोवती जमले होते,” असं म्हणत पोलिसांनी १०० लोकांच्या जमावाने मारहाण केल्याचा दावा फेटाळला.

पीडित कुटुंबाच्या वकिलांकडून पोलिसांवर गंभीर आरोप

सर्वोच्च न्यायालयातील वकील इहतेशाम हाश्मी यांनी पोलिसांवर पीडित कुटुंबावर दबाव आणण्यासाठी गुन्हा दाखल केल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले, “पीडित कुटुंबाने कॉल केल्यावर मी तातडीने रुग्णालयात गेलो. तेव्हा पोलिसांनी पीडित कुटुंबाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याऐवजी ३ ते ४ उपनिरिक्षक पीडित व्यक्तीच्या आजूबाजूला बसून दबाव आणण्यासाठी खोटी एफआयआर नोंदवत होते.”