scorecardresearch

VIDEO: कर्नाटकमध्ये जमावाची मशिदीमध्ये घुसखोरी, परिसरात जबरदस्तीने केली पूजा, ‘भारत माता की जय’च्या घोषणा, ओवेसी ट्वीट करत म्हणाले…

मशिदीच्या आवारात घुसखोरी करत पूजा घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

VIDEO: कर्नाटकमध्ये जमावाची मशिदीमध्ये घुसखोरी, परिसरात जबरदस्तीने केली पूजा, ‘भारत माता की जय’च्या घोषणा, ओवेसी ट्वीट करत म्हणाले…
बिदरमधील ऐतिहासिक महमूद गवान मदरसा आणि मशिदीमध्ये जमावाने घुसखोरी केल्याचा आरोप

कर्नाटकमध्ये मदरसा आणि मशिदीच्या आवारात घुसखोरी करत पूजा केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बिदरमधील ऐतिहासिक महमूद गवान मदरसा आणि मशिदीमध्ये जमावाने घुसखोरी केल्याचा आरोप आहे. जमावाने परिसरातील एका कोपऱ्यात पूजा घातली असा दावा आहे. तसंच जमावाने घोषणाबाजी करत तोडफोड केल्याचंही सांगितलं जात आहे.

या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही ट्विटरला कथित घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी पोलीस आणि भाजपाला लक्ष्य केलं असून, मुस्लिमांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे ६ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा – VIDEO: भाषण सुरु होताच मशिदीतून आला आवाज, अमित शाहांनी विचारलं “काय सुरु आहे?”, ‘अजान’ उत्तर मिळताच केलं असं काही

मुस्लिम संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. काही लोक गेट तोडून आत घुसले आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. तसंच जमावाने सुरक्षारक्षकाला धमकावलं आणि मशिदीच्या भिंतींजवळ कचरा फेकला असा त्यांचा आरोप आहे.

आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात आली नाही तर शुक्रवारी आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत नऊ जणांना अटक केली आहे.

पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, “निजामच्या काळापासून दसऱ्याला पूजा करण्याची परंपरा आहे. मशिदीच्या आवारात एक मिनार आहे. नेहमी दोन ते चार लोक आतमध्ये पूजा करण्यासाठी जातात. पण यावेळी मोठ्या संख्येने लोक आतमध्ये गेले होते. कोणीही बेकायदेशीरपणे गेट तोडून आतमध्ये घुसखोरी केलेली नाही. आम्ही गुन्हा दाखल केला आहे”.

पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं आहे की “हिंदू मशिदीच्या जवळ असणाऱ्या झाडाजवळ जाऊन नेहमी पूजा करतात. पण यावेळी तिथे ते झाड नव्हतं. हिंदू मशिदीजवळ गेले असतील तर यामध्ये काही नवीन नाही. प्रत्येत विजयादशीला ते पूजा करण्यासाठी जातात”.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या