पीटीआय, पेशावर

पाकिस्तानच्या स्वात शहरात संतप्त जमावाने एका पर्यटकाची गोळ्या झाडून हत्या केली आणि नंतर त्याला फरफटत शहरात आणून जाहीर फासावर लटकवले. त्याने कुराणचा अपमान केल्याचा कथित आरोप त्याच्यावर होता.

गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. महम्मद इस्माइल असे या पर्यटकाचे नाव असून तो पंजाब प्रांतातील सियालकोटचा रहिवासी आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या स्वात शहरात तो फिरण्यासाठी आला होता. स्वात जिल्ह्यातील खैबर पख्तुन्ख्वा प्रांतातील मादयान तालुक्यात त्याने इस्लामचा पवित्र ग्रंथ असलेल्या कुराणची काही पाने जाळली असा त्याच्यावर आरोप केला गेला. पोलिसांनी तक्रारीवरून आधी त्याला कोठडीत ठेवले होतेे, अशी स्वातच्या जिल्हा पोलीस अधिकारी जहीदुल्लाह यांनी दिली. पण नंतर स्थानिक मशिदीतून ही घटना जाहीरपणे सांगण्यात आली आणि पोलीस स्थानकाबाहेर संतप्त जमाव जमला. जमावाने इस्माइलला ताब्यात देण्याची मागणी केली. पोलिसांनी नकार देताच पोलीस आणि जमावात चकमक होऊन आठ जण जखमी झाल्याची माहिती ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ वृत्तपत्राने दिली.

हेही वाचा >>>‘तर नाव बदलेन’, पवन कल्याण निवडणूक जिंकताच बड्या नेत्याने खरोखरंच स्वतःचं नाव बदललं

त्यानंतर जमावाने पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांना हुसकावले आणि इस्माइलवर गोळ्या झाडल्या. मादयान अदा येथे फरफटत आणून त्याला जाहीर फासावर लटकवले. पोलिसांच्या गाड्या आणि पोलीस ठाण्यालाही संतप्त जमावाने आग लावली. ठाण्यातले कर्तव्यावरील पोलीस पळाले. नंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. खैबर पख्तुन्ख्वा प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा अहवाल प्रांताच्या पोलीस प्रमुखांकडून मागविला आहे.