पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये कारखान्यातील कामगार आणि इतरांच्या जमावाने एका कारखान्याच्या श्रीलंकन ​​निर्यात व्यवस्थापकाची हत्या केल्यानंतर आणि त्याचा मृतदेह जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर १०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, श्रीलंकन ​​नागरिकाच्या लिंचिंगमध्ये सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलिसांनी दहा पथके तयार केली आहेत.

पंजाब सरकारचे प्रवक्ते हसन खरवार यांनी पत्रकारांना सांगितले की, मॉब लिंचिंग प्रकरणात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, सीसीटीव्ही फुटेजवरून काहींची ओळख पटली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या कृत्याचा निषेध केला आणि म्हटले की हा देशासाठी लाजिरवाणा दिवस ​​आहे आणि त्यात सहभागी असलेल्या सर्वांना अटक केली जाईल.

याप्रकरणी श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने चौकशीची मागणी केली आहे, तर अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने स्वतंत्र तपासाचा आग्रह धरला आहे. घटना वजिराबाद रोड परिसरातील आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात शुक्रवारी एका श्रीलंकन ​​नागरिकाची जमावाने हत्या केली. त्या नागरिकावर ईशनिंदा केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला.

पंजाब पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे ४० वर्षीय प्रियंता कुमारा सियालकोट जिल्ह्यातील एका कारखान्यात महाव्यवस्थापक म्हणून काम करत होते. कुमाराने कथितरित्या कट्टरपंथी तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) चे पोस्टर फाडले, ज्यात कुराणातील आयत होत्या आणि नंतर ते कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकले. कुमारा यांच्या कार्यालयाजवळील भिंतीवर इस्लामिक पक्षाचे पोस्टर चिकटवण्यात आले होते. कारखान्यातील काही कामगारांनी त्यांना पोस्टर काढताना पाहिले आणि त्यांनी ही बाब कारखान्यात सांगितली. निंदेच्या घटनेबाबत आजूबाजूच्या परिसरातील शेकडो लोक कारखान्याबाहेर जमू लागले. त्यापैकी बहुतेक टीएलपी कार्यकर्ते आणि समर्थक होते.

श्रीलंकन ​​नागरिकाच्या मृतदेहाभोवती शेकडो लोक उभे असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले. ते टीएलपीच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. सियालकोटचे जिल्हा पोलीस अधिकारी उमर सईद मलिक म्हणाले की, श्रीलंकन ​​नागरिकाची हत्या झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असून सर्व कारखाने बंद आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांनी ही अत्यंत दुःखद घटना असल्याचे म्हटले आणि पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी करून २४ तासांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. “घटनेच्या प्रत्येक पैलूची चौकशी करून अहवाल सादर करावा,” असे मुख्यमंत्र्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे ते म्हणाले.