ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसा भडकली आहे. मणिपूरमधील बिष्णूपूर जिल्ह्यात मंगळवारी एका रॉकेटसारख्या वस्तूने घरावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात घरात झोपेत असलेल्या चार वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या नवजात बहिणीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्ह्यात हिंसाचार उसळला. दोन मुलांच्या मृत्यूनंतर अनेकठिकाणी तीव्र निदर्शने सुरू झाली. यानंतर सीआरपीएफने केलेल्या गोळीबारात दोन नागरिक ठार झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मणिपूरमधील पाच जिल्ह्यांमध्ये इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल, काकचिंग आणि बिष्णूपूर येथे तीन दिवसांसाठी इंटरनेट सेवा तात्पुरती बंद केली आहे. तसेच ज्या बिष्णूपूरमध्ये कथित रॉकेट हल्ला झाला, तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मैतेई-बहुल खोरे आणि कुकी-झोमी बहुल टेकड्या यांच्यातील संवेदनशील सीमेवर असलेल्या ट्रोंगलाओबी अवांग लेकाई या गावात पहाटेच्या वेळी रॉकेट हल्ला झाला. या स्फोटात मुलांची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित अतिरेक्यांनी घरावर स्फोटके फेकल्यामुळे दोन मुलांचा झोपेतेच मृत्यू झाल्याचा आरोप मुलांच्या आजीने केला.

मृत मुलांच्या आजीने सांगितले की, पहाटे १ वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला. माझी सून मदतीसाठी ओरडली. काय झाले असे विचारल्यानंतर तिने सांगितले की, खोलीत बॉम्बस्फोट झाला. आजी पुढे म्हणाल्या की, बंद खोलीत बॉम्ब कसा काय येऊ शकतो, हे मला कळले नाही. म्हणून मी धावत आत गेले तेव्हा धुराने खोली भरली होती. माझी दोन्ही नातवंडे रक्ताने माखलेल्या अवस्थेत खोलीत पडले होते.

अल्पवयीन मुलांच्या मृत्यूची बातमी पसरताच बिष्णूपूरमध्ये आंदोलन भडकले. स्थानिकांनी रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त केला. टायर जाळून रस्ते अडवले. संतप्त जमावाने दोन तेल टँकरसह तीन ट्रकही जाळले.

हिंसक झालेल्या आंदोलकांनी मोइरांग पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर जळती लाकडे मांडून ठेवली आणि पोलीस ठाणेही अडवले. इंफाळमध्ये आंदोलक अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. निदर्शकांनी रस्ते अडवून जळते टायर रस्त्यावर पसरवले. ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.

मुख्यमंत्र्यांनी हल्ल्याचा केला निषेध

मणिपूरचे मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी या घटनेचा निषेध करत या घटनेला रानटी कृत्य आणि मानवतेवरील उघड हल्ला म्हटले. या हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शोधून काढले जाईल आणि कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे दहशतवादी कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असेही ते म्हणाले.