Mahakumbh Viral Sadhvi Harsha Richariya: प्रयागराज येथे २०२५ मध्ये झालेल्या महाकुंभ मेळ्यात सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आणि मॉडेल हर्षा रिचारिया चर्चेत आली होती. शाही मिरवणुकीतील तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वात आकर्षक साध्वी म्हणून तिची चर्चा झाली. यानंतर आता वर्षभरातच हर्षा रिचारियाने धर्म आणि अध्यात्मापासून अंतर राखण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे सनातन धर्माचा प्रचार करणार नसल्याचे रिचारियाने म्हटले आहे. यामुळे तिने धर्माबाबत केलेल्या जुन्या विधानांचा व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत.
महाकुंभमध्ये निरंजनी आखाड्यातील मिरवणुकीत दिसल्यानंतर हर्षा रिचारिया चर्चेच्या केंद्रस्थानी होती. बुधवारी जबलपूर येथे आल्यानंतर हर्षा रिचारियाने नर्मदा नदीवरील गौरीघाटावर स्नान केले आणि माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाली हर्षा रिचारिया?
महाकुंभदरम्यान व्हायरल झाल्यानंतर मला विरोध आणि टीकेचा सामना करावा लागला. मी काही चुकीचे काम करत नव्हते. मात्र धर्माच्या रस्त्यावर चालताना जे काही करत होते, त्यापासून मला परावृत्त करण्यात येत होते. यामुळे माझे मनोधैर्य खचले. धर्माच्या, अध्यात्माच्या मार्गावर चालत असताना मला लक्ष्य केले गेले. यामुळे मला मोठा मानसिक धक्का बसला.
आर्थिक नुकसान आणि चुकीचे आरोप
हर्षा रिचारियाने आपल्या आर्थिक स्थितीवरही भाष्य केले. मी जेव्हा धर्म आणि अध्यात्मापासून दूर होते. तेव्हा सूत्रसंचालक आणि मॉडेलिंगमध्ये माझे करिअर व्यवस्थित सुरू होते. विदेशातही काम मिळत असल्यामुळे चांगले अर्थार्जन होत होते. मी अध्यात्माच्या वाटेवर आल्यानंतर माझ्यावर आरोप केला गेली की, धर्माला धंदा बनवून कोट्यवधी रुपये कमवते. मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे. मागच्या एका वर्षापासून माझी आर्थिक अवस्था हलाखीची बनली आहे.
आता नवा मार्ग निवडणार
हर्षाने पुढे म्हटले की, लहानपणापासून मला हवाई दलात लढाऊ विमानांचे पायलट व्हायचे होते. मात्र घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे मला कमी वयात नोकरी करावी लागली. त्यामुळे मी आता अध्यात्म आणि सनातन धर्मापासून वेगळे होत जीवनात नवा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आहे.
