नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊन १२ वर्षे झाली आहेत. त्यांच्या या १२ वर्षांची चांगलीच चर्चा आहे. मोदींनी विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला, तरुणांना नोकऱ्या देण्याची फक्त आश्वासनं दिली असा आरोप विरोधक करत आहेत. तर मोदींनी मागील १२ वर्षांत देशाची मान उंचावेल असा विकास केला, जगात भारताचं स्थान निर्माण केलं असं भाजपा आणि एनडीएचे नेते म्हणत आहेत. माजी सनदी अधिकारी आणि विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीची १२ वर्षे, देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होते आहे का? यासह प्रमुख मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले अविनाश धर्माधिकारी?
संपूर्ण देशाने जे ध्येय स्वीकारलं आहे ते ध्येय म्हणजे विकसित भारत २०४७. हे मांडताना जी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडली होती की आपणच हे करणारे आहोत असं नाही. सगळ्यांचं योगदान त्यांनी नमूद केलं होतं. मला ही बारा वर्षे ही भारताच्या टेक ऑफची बारा वर्षे वाटत आहेत. सुमारे २० वर्षांमध्ये जो टेक ऑफ व्हायचा आहे त्याची ही तयारी आहे असं मी साकल्याने वर्णन करेन असं अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे. नीट धोरणं आखली गेली आणि अंमलबजावणी झाली तर युवक हा लाभांश ठरतील. त्याच युवकांना योग्य शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळाल्या नाहीत तर याचं रुपांतर डेमोग्राफिक डिझास्टर मधे होऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची १२ वर्षे म्हणजे मुलभूत धोरणांची पायाभरणी करुन सज्ज झालेला भारत आहोत. आपण २०४७ पर्यंत आपला देश जगातला विकसित देश होऊ शकतो ही आशा बाळगणारी ही बारा वर्षे मला वाटतात असं अविनाश धर्माधिकारींनी म्हटलं आहे. थिंक बँक या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भारतात ज्या प्रकारे पायाभूत सुविधा वेगाने सुरु आहेत त्याचा वेग प्रचंड आहे-धर्माधिकारी
भारतात ज्या प्रकारे पायाभूत सुविधा ज्या वेगाने संपूर्ण देशात सुरु आहेत त्याला तोड नाही. देशात उघडे डोळे ठेवणारा माणूसही डोळ्यांना दिसेल अशा वेगाने हा विकास आहे. हा विकास २०१४ मध्येच सुरु झाला असं कुणीच म्हणत नाही. पण २०१४ नंतर त्याला गती आली आहे. भारताच्या पायाभूत सुविधा जागतिक पातळीच्या होऊ लागल्या आहेत असंही अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटलंय.जगातले विकसित देश पाहताना हृदयाला हजार इंगळ्या डसायच्या आणि वाटायचं की माझा भारत असा कधी होईल का? आणि ते सुरु झालं आहे. शिवाय ते तुकड्या तुकड्यांनी नाही.मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, सुवर्ण चतुष्कोन जोडला जाणार आहे. रस्ते, रेल्वे, जलमार्ग, विमान मार्ग, जल वाहतूक देशांतर्गत नद्यांची असो किंवा समुद्रांमधली असो अशा सगळ्यांमध्ये विकास सुरु आहे. अत्यंत वेगाने आणि योजनाबद्ध पद्धतीने अंमलबजावणी सुरु आहे हे कुणीही नाकारणार नाही असंही अविनाश धर्माधिकारी म्हणाले.
आत्मविश्वास असलेला भारत हा आपल्याला सापडला आहे-धर्माधिकारी
आत्मविश्वास असलेला भारत हा आपल्याला सापडला आहे. तरुण पिढीला ही आत्मविश्वास आणि जागतिक स्पर्धेला सामोरं जायचं आहे. आत्मनिर्भर भारत ही फार महत्त्वाची व्हिजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ मे २०२० रोजी ही भूमिका मांडली. करोनाचा काळ होता. अत्यंत वेदनादायी असा तो काळ होता. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली होती. मला ती ऐकत असतानाची भावना लक्षात आहे आणि मागच्या सहा वर्षांत ती आणखी बळकट झाली आहे. करोना काळात भारतासह जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती, त्या काळात मोदींनी ही व्हिजन मांडली. भारताच्या शक्ती या संघटित करुन भारताचं बळ असं उभं करायचं की जगात काहीही समस्या उद्भवल्या तरीही भारत त्यांना पुरुन उरत उभा राहिल असं मी त्या आत्मनिर्भर भारतकडे पाहतो.
वसुधैव कुटुंबकम हा भारताचा जीवनविषयक विचार आहे-धर्माधिकारी
पुरवठा साखळ्यांचा जो मुद्दा आहे त्याचे परिणाम जगावर होत आहेतच. रशिया-युक्रेन सुरु झालं तरीही पुरवठा साखळ्यांचा प्रश्न होताच. आता इराण-इस्रायल-अमेरिका त्यानंतर होर्मुझ ची खाडी, लाल समुद्र जिथे अरबी समुद्राला मिळतो तिथे हुथी किंवा सोमाली चाचे असले तर त्यापासून भारताचं कसं रक्षण करायचं याकडे लक्ष दिलं जातं आहे. भारताची जगातली प्रतिमा ही विश्वमित्र अशी तयार होते आहे, विश्वगुरु व्हावा असा दावा कुणी करत नाही. जे टीका करत, हसतात त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करतो. खूप लांबचं अंतर आहे हे मला मान्य आहे. विश्वगुरु होणं हे काय आर्थिक व्यवस्थेवर अवंलबून नाही. भारत, भारतीय संस्कृतीचा विचार करता ती लष्करी विचारही असा नाही. भारतीय संस्कृती कुणाला टाचेखाली ठेवणारी नाही. वसुधैव कुटुंबकम हा जीवनकडे बघण्याचा भारताचा विचार आहे.

उर्जा सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे-धर्माधिकारी
भारताला सार्वभौमत्व जर क्रमांक एकवर ठेवायचं असेल तर उर्जा सुरक्षा ही महत्त्वाची आहे. आजच्या तारखेला तरी शास्त्रीय दृष्ट्या उर्जेची साधनं आहेत ती म्हणजे कोळसा आणि तेल. या दोहोंमुळे प्रदूषण होतं आहे. कोळसा आणि तेलाला अल्टरनेटिव्ह किंवा पर्याय शोधले पाहिजेत. भारत आणि आपलं सार्वभौमत्व लक्षात घेता आणि आपण उर्जेच्या बाबतीत परावलंबी आहोत. तेल तर आपण ८५ टक्क्यांपर्यंत आयातच करतो. प्रसंगी आपल्याला तडजोडीही करावी लागतात. आपल्याकडे पुढची ४०० वर्षे पुरेल इतका कोळसा आहे पण त्याची गुणवत्ता कमी आहे. आपण ऑस्ट्रेलियाकडून कोळसा आयात करतो असंही अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे.
