पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाच्या दौऱ्यात टाटा कन्सलटन्सी सव्‍‌र्हिसेसच्या सर्व महिला कर्मचारी असलेल्या प्रशिक्षण केंद्रास भेट दिली, तेथील कर्मचाऱ्यांना त्यांनी भारतभेटीचे निमंत्रण दिले. मोदी यांनी सांगितले, की सौदी अरेबियाची शान असलेल्या या माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्राला दिलेली भेट ही महत्त्वाची आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री व टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन चंद्रशेखरन यांनी मोदी यांचे स्वागत केले. मोदी यांनी चाळीस मिनिटे या केंद्रात व्यतीत केली, महिला कर्मचाऱ्यांसमवेत सेल्फीही काढले गेले. तुम्ही भारतात या, तुमचे भव्य स्वागत करू, आज येथे जे वातावरण आहे त्यातून जगाला ठोस संदेश गेला आहे, असे ते म्हणाले.
टीसीएस केंद्रात एक हजार महिला कर्मचारी बीपीओचे काम करतात. त्यातील ८५ टक्के महिला या सौदी अरेबियाच्या नागरिक आहेत. मनुष्यबळ हे फार मोठी भूमिका पार पाडत असते. महिलांची ही ताकद विकासात मोठी मदत करणारी आहे, महिलांचा हातभार लागल्यानंतर कुठल्याही देशाची प्रगती वेगाने होणार यात शंका नाही. टीसीएसने असे कें द्र येथे उभारले त्याबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो, असे सांगून मोदी म्हणाले, की भारताच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाने जगात नाव कमावले आहे.