पीटीआय, जयपूर : आपल्या सरकारची आठ वर्षे सुप्रशासन आणि सामाजिक न्यायाला समर्पित होती. देशापुढील मुख्य मुद्दय़ांना बगल देऊन अन्यत्र लक्ष वेधण्याच्या विरोधकांच्या सापळय़ात न अडकता भाजप नेत्यांनी सदैव राष्ट्रहिताच्या मुद्दय़ांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयपूर येथील भाजप पदाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना मोदी बोलत होते. ते म्हणाले, की देशहिताचे मुख्य मुद्दे घेऊन काम करा. त्यासाठी कमी मेहनतीत फळाची अपेक्षा ठेवणारा ‘शॉर्टकट’ न अवलंबता दीर्घकाळ आणि सातत्याने मेहनतीने आपले लक्ष्य गाठा. भाजपने आगामी २५ वर्षांचे लक्ष्य निश्चित करून, ते गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.  सरकारने आठ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त आणि वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत कथित शिविलग सापडल्याच्या मुद्दय़ांवरून वादंग निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले, की भाजपने विकासाचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य पटलावर आणला. मात्र, काही राजकीय पक्ष त्यांच्या क्षणिक फायद्यासाठी राष्ट्राच्या भवितव्याशी धोकादायक खेळ खेळत आहेत.

आपल्या स्वार्थासाठी काही पक्ष समाजातील कच्चे दुवे आणि छोटे ताण-तणावांचे मुद्दे हेरून विष कालवण्याचे काम करीत आहेत. जात अथवा प्रादेशिकतेच्या नावाखाली विरोधक जनतेला चिथावणी देत आहेत. अशा पक्ष आणि शक्तींपासून जनतेला सावध करत भाजपने मात्र ‘एक भारत : श्रेष्ठ भारत’ या स्वप्नपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्नरत राहावे, असे आवाहन मोदी यांनी केले. पूर्वी जनसंघ असल्यापासून भाजपचा राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित, राष्ट्रोद्धाराच्या सूत्रांवर भर राहिला आहे, असे मोदी म्हणाले.

सर्व भाषा ‘भारतीयत्वा’चा आत्मा!

सर्व भारतीय भाषा ‘भारतीयत्वा’चा आत्मा असल्याने आदरास पात्र आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्थानिक भाषांना प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषांना न्याय देण्याचे सरकारचे धोरण अधोरेखित होते. या भाषांच्या विकासानेच देशाचे भवितव्य उज्ज्वल होणार आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

भाजपची धोरणे आणि उपक्रमांत त्यांना कायमच प्राधान्य दिले जात आहे. या राष्ट्रभक्तीतूनच पक्षाला विकास आणि विश्वासार्हतेची प्रेरणा मिळते. गरिबांच्या कल्याणासाठी भाजपने सतत काम करावे. गरिबांना सक्षम करण्यासाठी झटावे. या मार्गावरून कधीही विचलित होऊ नये, असे मोदी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार आठ वर्षे पूर्ण करत असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की ही आठ वर्षे संकल्प आणि संकल्पपूर्तीची होती. सेवा, सुप्रशासन आणि गरिबांच्या कल्याणास ही आठ वर्षे समर्पित होती. अल्प भूधारक शेतकरी, मजूर आणि मध्यमवर्गीयांच्या अपेक्षांची पूर्तता करणारी ही आठ वर्षे होती. देशाचा संतुलित विकास, सामाजिक न्याय आणि सुरक्षा आणि स्त्री सक्षमीकरणासाठी ही आठ वर्षे देण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi appeal bjp office bearers set target good governance social justice dedicated ysh
First published on: 21-05-2022 at 00:02 IST