भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अरूणाचलप्रदेशातील इटानगर येथे झालेल्या जाहीर सभेत काँग्रेस पक्षाचा चांगलाच समाचार घेतला. या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षाने जनतेशी आजपर्यंत उद्दामपणे वागत आल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या राजवटीपासून देशाला मुक्त करण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी या सभेत केले. यापूर्वी सोनिया गांधींकडून मोदींना अचानक देशप्रेमाचे भरते आले असल्याची टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना निष्पाप भारतीय मच्छिमारांची हत्या करणा-या इटालियन नौसैनिकांना दिल्लीतील काँग्रेस सरकार सोडून देते, तेव्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना माझ्या देशप्रेमाविषयी शंका घेण्याचा हक्क नसल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले. या सभेत काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ‘घोषणापत्र’ नसून ‘धोकापत्र’ असल्याचे सांगत नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यावर कडाडून टीका केली. तसेच निवडणुकांच्या काळातील आपली वचने न पाळणा-या काँग्रेसशी अरूणाचलप्रदेशातील जनतेने नाते तोडून टाकावे असे आवाहनसुद्धा मोदींनी यावेळी केले.