Modi Cabinet Expansion : देशाला मिळणार नवीन आरोग्यमंत्री; हर्ष वर्धन यांचा राजीनामा

मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला

Modi Cabinet Expansion Union Health Minister resigns amid Corona crisis
मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनं राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळात गाठीभेटी सुरू होत्या. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला असून, आज सायंकाळी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात येत आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारापुर्वी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशाला नवीन आरोग्यमंत्री मिळणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करणार आहेत. या अगोदर आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा, कामगार मंत्री संतोष गंगवार आणि शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, रतनलाल कटारिया, प्रताप सारंगी आणि देवश्री बॅनर्जी यांनीही केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.

 

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत निवासस्थानी मंत्रीपदाच्या संभाव्य नेत्यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हेही पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होते.

रणदीप सुरजेवाला यांनी केली होती हर्ष वर्धन यांना हटविण्याची मागणी

मोदी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. कामगिरीच्या आधारे मंत्र्यांना काढून नवीन नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान कॉंग्रेसने यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ता सुरजेवाला म्हणाले, “तेलाच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेले धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तसेच डॉ. हर्ष वर्धन यांनी खराब कोविड व्यवस्थापनामुळे मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा”

यासोबत कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, यांना देखील हटविण्याची मागणी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Modi cabinet expansion union health minister resigns amid corona crisis srk

ताज्या बातम्या