पीटीआय, एल्माऊ (जर्मनी) : भारताची हवामानाबाबतची बांधिलकी त्याच्या कामगिरीवरून अधोरेखित होते. भारतासारखा मोठा देश जेव्हा अशी महत्त्वाकांक्षा दाखवतो, तेव्हा इतर विकसनशील देशांनाही प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारतात स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाची मोठी बाजारपेठ उदयास येत असून जी -७ देशांनी या क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे आवाहनही मोदी यांनी केले.

जर्मनीत आयोजित केलेल्या ‘जी-७ परिषदे’च्या निमित्ताने मोदी यांनी हवामान आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांत भारत करीत असलेल्या कामगिरीची माहिती दिली. यावेळी मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कॉल्झ, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रॅम्फोसा यांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली. जी -७ परिषदेतील ‘उत्तम भविष्यातील गुंतवणूक: हवामान, ऊर्जा, आरोग्य’ या विषयावरील सत्रात मोदींनी भारताच्या आजपर्यंतच्या प्रयत्नांचा आढावा घेतला. भारताने अ-जीवाश्म स्त्रोतांमार्फत ४० टक्के ऊर्जा-क्षमतेचे लक्ष्य नऊ वर्षे आधीच गाठल्याचे मोदी यांनी सांगितले. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य भारताने पाचमहिने आधीच गाठले. पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारा जगातील पहिला विमानतळ भारतात आहे, असेही मोदी यांनी म्हणाले. भारतासारखा देश अशी महत्त्वाकांक्षा दाखवतो तेव्हा त्याच्याकडून विकसनशील देशांना प्रेरणा मिळते. म्हणून जी -७ मधील श्रीमंत देश भारताला याबाबतीत पाठिंबा देतील, अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केली.