नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. रशियाने संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे युक्रेनशी सुरू असलेल्या वादावर तोडगा काढावा, या भारताच्या   भूमिकेचा मोदींनी या वेळी पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा आणि अन्नधान्य बाजारपेठेच्या सद्य:स्थितीसह जागतिक मुद्दय़ांवरही चर्चा केली, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने निवेदनाद्वारे दिली आहे.

दोन्ही नेत्यांनी डिसेंबर २०२१ मध्ये पुतिन यांच्या भारतभेटीदरम्यान घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. द्विपक्षीय व्यापाराला विशेषत: कृषी क्षेत्रातील उत्पादने, खते आणि औषध उत्पादन क्षेत्रात अधिक प्रोत्साहन कसे देता येईल, यावर विचारविनिमय केला. या वेळी दोन्ही नेत्यांनी जागतिक आणि द्विपक्षीय मुद्दय़ांवर नियमित संवाद सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली. पुतिन यांच्याशी चर्चेच्या काही दिवस आधी, मोदींनी ‘जी-७’ सदस्य राष्ट्रांच्या शिखर परिषदेत युक्रेन संघर्षांसंदर्भात भारत नेहमीच शांतता राखण्याचे समर्थन करेल, असे ठामपणे सांगितले होते. ते म्हणाले होते, की आम्ही सतत संवाद व मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचा आग्रह धरला आहे.