राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचं नाव मोदी सरकारने बदललं आहे. आता हे उद्यान अमृत उद्यान या नावाने ओळखलं जाणार आहे. राष्ट्रपती भवनात असलेलं मुघल गार्डन हे त्यातल्या सुंदर फुलांसाठी प्रसिद्ध आहे. हे गार्डन पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी उपस्थिती लावतात. आता हे उद्यान अमृत उद्यान नावाने ओळखलं जाणार आहे.
अमृत उद्यानात काय आहे खास?
अमृत उद्यान हे १५ एकरमध्ये पसरलेलं विस्तीर्ण उद्यान आहे. या बागेत १३८ प्रकारचे गुलाब, १० हजारपेक्षा जास्त ट्यूलिप बल्ब, ७० विविध प्रकारची ५ हजार प्रकारची मोसमी फुलं असं सगळं या बागेत आहे. हे उद्यान देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी जनतेसाठी खुलं केलं होतं. त्यानंतर दरवर्षी वसंत ऋतूमध्ये हे भव्य उद्यान सगळ्यांसाठी खुलं केलं जातं. हे उद्यान म्हणजे राष्ट्रपती भवनाचा आत्मा आहे असंही म्हटलं जातं. मुघल गार्डन असं नाव असलेल्या या उद्यानाला आता अमृत उद्यान असं म्हटलं जाणार आहे. या संपूर्ण उद्यानाचा एक मोठा भाग हा वैविध्यपूर्ण गुलाबांसाठी ओळखला जातो. ब्रिटिश वास्तुविशारद एडवर्ड ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनाची आणि मुघल गार्डनचं डिझाईन केलं होतं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रेस सेक्रेटरी नविका गुप्ता यांनी माहिती दिली की मुघल गार्डनमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या सुविधेसाठी सगळ्या रोपांवर, झाडांवर क्यू आर कोड लावण्यात आला आहे. तसंच या ठिकाणी माहिती देणारे २० प्रोफेशनल गाईडही ठेवण्यात आले आहेत जे लोकांना, पर्यटकांना यासंबंधीची माहिती देऊ शकतील.
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि रामनाथ कोविंद यांच्या कार्यकाळात अमृत उद्यानात चार विविध बागा होत्या. आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे. आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. त्यामुळेच मुघल गार्डन हे नाव बदलून अमृत गार्डन असं या गार्डनला यापुढे संबोधलं जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. ३१ जानेवारीपासून हे गार्डन सगळ्यांसाठी खुलं होणार आहे. २६ मार्च २०२३ पर्यंत हे गार्डन सुरू असणार आहे. या ठिकाणी उत्सव २०२३ साजरा होणार आहे. सोमवार आणि होळीच्य दिवशी हे गार्डन पर्यटकांसाठी बंद असणार आहे.