कर्तारपूर मार्गिका आजपासून पुन्हा खुली

पंजाबमध्ये पुढील वर्षांरंभी विधानसभेची निवडणूक होत असून ही मार्गिका पुन्हा खुली केल्याचा राजकीय लाभ निवडणुकीत मिळू शकतो.

नवी दिल्ली : येत्या १९ नोव्हेंबर रोजी गुरुपर्व असून त्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून (१७ नोव्हेंबर) कर्तारपूरसाहिब मार्गिका खुली करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे भारतातील भाविक पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देऊ शकतील.

कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन नोव्हेंबर २०१९ मध्ये झाले होते. मार्च २०२० मध्ये करोनाची साथ सुरू झाल्यापासून ही मार्गिका बंद करण्यात आली होती. पंजाबमध्ये पुढील वर्षांरंभी विधानसभेची निवडणूक होत असून ही मार्गिका पुन्हा खुली केल्याचा राजकीय लाभ निवडणुकीत मिळू शकतो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी ट्विटरवर म्हटले आहे की, कर्तारपूरसाहिब मार्गिका बुधवारपासून खुली करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्याचा शीख भाविकांना मोठा लाभ होणार आहे. या निर्णयातून मोदी सरकारची शीख समाजाबद्दलची आस्था आणि गुरू नानक देवजी यांच्याबद्दलची भक्ती दिसून येते, असेही शहा यांनी नमूद केले आहे. ‘‘ देशात गुरू नानक देवजी यांचा प्रकाश उत्सव १९ नोव्हेंबरला साजरा करण्याची तयारी सुरू आहे. कर्तारपूर मार्गिका खुली करण्याच्या मोदी सरकारच्या या निर्णयामुळे या उत्सवाचा आनंद आणि उत्साह कैकपटीने वाढेल, असा मला विश्वास आहे,’’  असे शहा म्हणाले.  पंजाबमधील भाजपच्या नेत्यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कर्तारपूर मार्गिका खुली करण्याची मागणी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गिकेने जाणाऱ्या भाविकांना सामाजिक अंतरनियमन, लशीच्या दोन मात्रा, ७२ तासांत आरटीपीसीआर चाचणी आदी करोना नियमांचे पालन करावे लागण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवडय़ात पाकिस्ताननेही भारताला कर्तारपूर मार्गिका खुली करण्याचे आवाहन केले होते. या चार किलोमीटरच्या मार्गिकेतून भारतातील शीख भाविकांना व्हिसा न काढताच पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देता येते. याबाबतच्या करारावर २४ ऑक्टोबर २०१९ रोजी उभय देशांतर्फे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Modi government decides to reopen kartarpur corridor for pilgrims zws