Delhi High Court on Sonam Wangchuk Hunger Strike: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे १९ दिवसांपासून उपोषणासाठी बसले आहेत. त्यांचे वजन खूपच कमी झाले असून हे उपोषण फार काळ चालू नये, यासाठी आता प्रयत्न करण्यात येत आहेत. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी एका वरिष्ठ वकिलांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर आता केंद्र सरकारचे उत्तर आले आहे.

एका ज्येष्ठ वकिलाने सोनम वांगचुक (५९) या प्रकृतीच्या चिंतेसाठी हायकोर्टात धाव घेतली. याचिकाकर्त्याने आरोप केला की, केंद्र सरकार वांगचुक यांना दहशतवाद्याप्रमाणे वागणूक देत आहे. वांगचुक यांना योग्य आणि आवश्यक असे वैद्यकीय उपचार मिळावेत आणि हे मिळण्यासाठी उच्च न्यायालयाने केंद्राला आदेश द्यावेत, असे याचिकाकर्त्याने म्हटले.

याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर रोजच्या रोज लक्ष ठेवण्याचे आणि जिथे गरज असेल तिथे वैद्यकीय हस्तक्षेप करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले.

केंद्र सरकारने काय म्हटले?

केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी बाजू मांडली. सरकारी डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ यांच्यामार्फत रोजच्या रोज वांगचुक यांच्या प्रकृतीची तपासणी केली जाईल. तसेच वांगचुक यांच्या प्रकृतीच्या मूल्यांकनानुसार गरज भासेल तेव्हा वैद्यकीय हस्तक्षेप केला जाईल, असे तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले.

लाईव्ह लॉने दिलेल्या बातमीनुसार, मेहता म्हणाले की, डॉक्टरांच्या अहवालानुसार जी जी वैद्यकीय मदत लागेल, ती केंद्राकडून पुरवली जाईल.

केंद्र सरकारकडून उच्च न्यायालयात मांडलेली भूमिका ही सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबद्दलची ही पहिली प्रतिक्रिया असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी सरकारतर्फे यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. दरम्यान विरोधी पक्षातील अनेक नेते, सेलिब्रिटी, एन्फ्लुएन्सर यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला आहे. तसेच सरकारने त्यांच्याशी संवाद साधावा, अशी मागणी केली आहे.

जीवन अमूल्य आहे – उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायाधीश तेजस कारिया यांनी सुनावणीदरम्यान देशातील प्रत्येक नागरिकाचे आयुष्य अमूल्य असल्याचे म्हटले. त्यामुळे सरकारने वांगचुक यांच्या प्रकृतीकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. तसेच महाधिवक्ता तुषार मेहता यांनी जी बाजू मांडली, त्यावरी उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या एका वकिलाने याचिका दाखल करत त्यांचे उपोषण थांबविण्यासाठी केंद्राला निर्देश देण्याची मागणी केली. केंद्र सरकार वांगचुक यांना अतिरेकी समजत असून त्यांच्या उपोषणासंदर्भात निरुत्साही दिसत आहे, असा आरोप वकिलांनी केला. यानंतर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश दिले.