केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रविवारी विरोधी पक्ष धर्मनिरपेक्षतेला त्यांचे राजकीय साधन मानत असल्याचे म्हणत निशाणा साधला आहे. काही राजकीय पक्षांनी धर्मनिरपेक्षतेला आपले राजकीय शस्त्र बनवले आहे आणि संविधानाची मूलभूत रचना तोडली आहे. धर्मनिरपेक्षता ही भाजपाची घटनात्मक आणि राष्ट्रीय जबाबदारी असल्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. यासोबत अल्पसंख्याकांच्या बाबतीतील सरकारची असलेली भूमिका सिद्ध करण्यासाठी काही आकडेवारीही दिली आहे.

मोदी सरकारच्या गृहनिर्माण प्रकल्पाचा लाभ घेतलेल्या दोन कोटी लोकांपैकी ३१ टक्के अल्पसंख्याक आहेत, तर किसान सन्मान निधी मिळणाऱ्या १२ कोटी शेतकऱ्यांपैकी ३३ टक्के अल्पसंख्याक आहेत असे नक्वी यांनी यांनी म्हटले आहे.

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना, विरोधी पक्ष त्यांच्या राजकीय फायद्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा वापर करत आहेत आणि भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांशी विश्वासघात करत आहेत असा आरोप नक्वी यांनी केला आहे. “काही लोकांनी धर्मनिरपेक्षता हा शब्द केवळ राजकीय फायद्यासाठी वापरला आहे,” असे नक्वी म्हणाले.

“जर तुम्ही ७५ वर्षांचा भारतीय इतिहास पाहिला तर तुम्हाला दिसेल की काही राजकीय पक्षांनी धर्मनिरपेक्षतेला आपल्या राजकीय फायद्याचे साधन बनवले आहे. त्यांनी आपल्या भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांचा विश्वासघात केला आहे. इतर पक्षांप्रमाणे धर्मनिरपेक्षता ही भाजपाची घटनात्मक आणि राष्ट्रीय जबाबदारी आहे,” असेही नक्वी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना नक्वी म्हणाले, “गेल्या सात वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घटनात्मक मूल्यांशी बांधिलकीने सर्वसमावेशक सक्षमीकरणासाठी काम केले आहे. यामुळे हे सुनिश्चित केले आहे की अल्पसंख्यांसह सर्व विभाग विकास प्रक्रियेत समान भागीदार बनतील.”