मोदी सरकारकडून आगामी दोन वर्षांत केंद्रीय सेवेत तब्बल दोन लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाण्याची शक्यता आहे. सरकारने १ मार्च २०१५ पासून पुढील दोन वर्षात केंद्रात २,२०,००० पदे भरण्याची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेनंतर विविध अडचणींमुळे नवीन भरतीची प्रक्रिया रेंगाळली होती. त्यामुळे आता येत्या दोन वर्षांत सरकारकडून नोकरभरतीच्या या प्रक्रियेला चालना मिळण्याची शक्यता आहे.
२०१६-१७च्या अंदाजपत्रकानुसार, १ मार्च २०१५ रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या ३३.०५ लाख इतकी होती. ती १ मार्च २०१६ पर्यंत ३४.९३ लाख आणि १ मार्च २०१७ पर्यंत ३५.२३ लाखांपर्यंत नेण्याचा सरकारचा मानस होता. कर्मचारी भरती होणाऱ्या खात्यांमध्ये रेल्वेचाही समावेश आहे. गेल्या तीन वर्षात रेल्वे खात्यात एकही नवीन कर्मचारी भरती करण्यात आला नव्हता. रेल्वेच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या १३,२६,४३७ इतकी आहे. मात्र, या भरती प्रक्रियेतून संरक्षण दलाला वगळण्यात आले आहे. महसूल खात्यात सर्वात जास्त ७० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून त्याखालोखाल केंद्रीय निमलष्करी दलात ४७ हजार आणि केंद्रीय गृहखात्यात निमलष्करी दल वगळता सहा हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.