पीटीआय, नवी दिल्ली
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण होत असताना, काँग्रेसने सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकारने गेल्या १२ वर्षांत वारेमाप आश्वासने दिली. मात्र लोकांचे जीवन बदलण्याच्या दृष्टीने कोणतीही ठोस कृती झाली नाही असा आरोप पक्षाने केला. त्यासाठी ‘आश्वासने विरुद्ध वास्तव’ या आशयाचा दस्तऐवज प्रसिद्ध केला.
पक्षाच्या संशोधन विभागातर्फे ७५ पानी दस्ताऐवजात सरकारवर विविध आरोप करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नेते राजीव गौडा व अमिताभ दुबे यांच्या हस्ते तो प्रकाशित करण्यात आला. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींच्या गॅस सिलिंडरमध्ये सरकारने कपात केली आहे, त्यावर दुबे यांनी टीका केली.
सरकारने प्रचारतंत्रावर भर दिला, प्रत्यक्षात आर्थिक आघाडीवर किंवा परराष्ट्र धोरण या सर्वच पातळीवर मोदी सरकारला अपयश आल्याचा दावा दुबे यांनी केला. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असून, शहरी बेरोजगारी १८.४ टक्क्यांवर गेली असून केवळ सात टक्के पदवीधरांना शिक्षणानंतर वर्षभरात कायमस्वरूपी रोजगार मिळत असल्याचे चित्र असल्याचे दुबे यांनी नमूद केले. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी दुबे यांनी केली.
