शेतकरी नेते आणि भारतीय जनता युनियनचे म्हणजेच बीकेयूचे राष्ट्रीय प्रवक्ते असणाऱ्या राकेश टिकैत यांनी एक विचित्र दावा केला आहे. सध्या सुरु असणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानविरोधात पराभूत होण्यास भाग पाडल्याचं टिकैत यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भारतीय संघाच्या पराभवामुळे मतं मिळणार असतील तर भारत सरकार संघाला पराभूत होण्यासाठी भाग पाडू शकतं,” असं टिकैत म्हणाले आहेत. हा सामना भाजपासाठी महत्वाचा नव्हता तर मतं महत्वाची आहेत, असंही टीकैत म्हणाले आहेत. टीकैत यांनी मंगळवारी बागपथमध्ये हे वक्तव्य केलं असून याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

सामना पाहिला नाही पण…
“मी सामना पाहिला नाही पण मी गावकऱ्यांकडून ऐकलं आहे की हे मोदी सरकारने घडवून आणलं आहे. यामुळे काही लोक फटाके फोडतील तर काही भारतीय संघातील खेळाडूंचा अपमान करतील. हे सारं मला गावकऱ्यांनी सांगितलंय,” असं टीकैत म्हणाले.

मानहानीकारक पराभव
फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या (३/३१) भेदक माऱ्यानंतर मोहम्मद रिझवान (नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आझमने (नाबाद ६८) केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली. भारताचा कर्णधार विराट कोहलीचे (५७) झुंजार अर्धशतक व्यर्थ ठरले.

भारताचे पारडे जड मानले जात होते पण…
दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कोहलीच्या संघाला अपेक्षित खेळ करण्यात अपयश आले. १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. रिझवान आणि आझम या भरवशाच्या सलामीवीरांनी या वर्षांतील चौथी शतकी भागीदारी रचली. रिझवानने ५५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली.

भारताचा डाव गडगडला…
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताला २० षटकांत ७ बाद १५१ धावाच करता आल्या. रोहित शर्मा (०) आणि के. एल. राहुल (३) या सलामीच्या जोडीला शाहीनने स्वस्तात माघारी पाठवले. तसेच सूर्यकुमार यादवही (११) मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यानंतर मात्र कोहली (५७) आणि ऋषभ पंत (३९) यांनी पडझड थांबवली. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी ५३ धावांची भागीदारी रचल्यावर फिरकीपटू शादाब खानने ऋषभला बाद केले. कोहलीने ४९ चेंडूत ५७ धावांची खेळी केल्यावर त्याला शाहीननेच माघारी धाडले. त्यामुळे भारताला जेमतेम १५० धावांचा टप्पा पार करता आला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi govt made team india lose match against pakistan for votes alleges rakesh tikait scsg
First published on: 28-10-2021 at 08:35 IST