पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली होती. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बूस्टर डोस देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले आहे. जानेवारीपासून देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार करून त्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात येईल. या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ ३ जानेवारीपासून होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी यांनी म्हटले आहे. जगभरात लहान मुलांचे लसीकरण सुरु असून भारतातही लहान मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

मात्र एम्समधील प्रमुख एपिडेमियोलॉजिस्ट असलेल्या डॉ संजय के राय यांनी कोविड विरूद्ध मुलांना लस देण्याचा केंद्राचा निर्णय अवैज्ञानिक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कोणताही अतिरिक्त फायदा होणार नाही असे ही ते म्हणाले. डॉ संजय के राय हे एम्समधील प्रौढ आणि मुलांसाठी कोवॅक्सिन चाचण्यांचे प्रमुख तपासक आहेत. ते भारतीय सार्वजनिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत.

निर्णय लागू करण्यापूर्वी, ज्या देशांनी आधीच मुलांचे लसीकरण सुरू केले आहे त्यांच्या माहितीचे विश्लेषण केले पाहिजे होते असे मत राय यांनी मांडले आहे. शनिवारी रात्री देशाला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड-१९ विरूद्ध लसीकरण तीन जानेवारीपासून सुरू होईल, अशी घोषणा केली. यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या मुलांची आणि त्यांच्या पालकांची चिंता कमी होईल आणि साथीच्या रोगाविरुद्धच्या लढ्याला चालना मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.

लोकसत्ता विश्लेषण : तुम्हाला बूस्टर डोस कधी मिळेल? दुसऱ्या डोसनंतर किती असणार अंतर?; जाणून घ्या..

“पंतप्रधान मोदींनी देशाची निःस्वार्थ सेवा केल्याने आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. पण मुलांच्या लसीकरणाबाबत त्यांनी घेतलेल्या अवैज्ञानिक निर्णयामुळे मी पूर्णपणे निराश झालो आहे,” असे राय यांनी पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत ट्विटमध्ये म्हटले आहे.

राय यांनी आपला दृष्टिकोन स्पष्ट करताना सांगितले की, कोणत्याही हस्तक्षेपाचे स्पष्ट उद्दिष्ट असावे. त्याचा उद्देश एकतर करोना व्हायरसचा संसर्ग किंवा मृत्यू रोखणे आहे. पण लसींबद्दल आपल्याला जे काही ज्ञान आहे त्यानुसार, ते संसर्गामध्ये लक्षणीयरीत्या कमी करू शकत नाहीत. काही देशांमध्ये, बूस्टर शॉट्स घेतल्यानंतरही लोकांना संसर्ग होत आहे, असेही राय म्हणाले.

लोकसत्ता विश्लेषण : कोविड-१९ लस मुलांसाठी सुरक्षित आहे का?; जाणून घ्या..

“तसेच, ब्रिटनमध्ये दररोज ५०,००० रुग्णांची नोंद केली जात आहे. त्यामुळे हे सिद्ध होते की लसीकरण करोना व्हायरस संसर्ग रोखत नाही. पण लस करोनाची तीव्रता आणि मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी आहे,” राय यांनी पीटीआयला सांगितले. “कोविड-१९ मुळे अतिसंवेदनशील लोकसंख्येमध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे १.५ टक्के आहे, म्हणजे प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे १५,००० मृत्यू,” असे राय यांनी सांगितले.

लोकसत्ता विश्लेषण: ओमायक्रॉनवर मात करण्यासाठी लशीच्या बूस्टर डोसची गरज कधी व किती वेळा लागू शकते?

दरम्यान, मुलांच्या बाबतीत, राय म्हणाले की, “मुलांमध्ये संसर्गाची तीव्रता खूपच कमी आहे आणि सार्वजनिक असेलेल्या उपलब्ध डेटानुसार, प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे फक्त दोन मृत्यू नोंदवले गेले आहेत. अमेरिकेसह काही देशांनी चार-पाच महिन्यांपूर्वी मुलांना लस देण्यास सुरुवात केली. मुलांसाठी कोविड लसीकरण सुरू करण्यापूर्वी या देशांच्या डेटाचे विश्लेषण केले पाहिजे.”