पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांना विलंब (डिले) हा शब्द त्यांच्या डिक्शनरीतून काढून टाकण्याची सूचना केली असून, वेगाने निर्णय घेण्याचे सांगितले असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी एका कार्यक्रमात स्पष्ट केले. माध्यमे आणि मनोरंजन विश्वातील प्रतिनिधीसाठी ‘असोचॅम’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना जावडेकर यांनी मोदी सरकारचे सूत्र सांगितले.
ते म्हणाले, ‘डिले इज आऊट, डिसिजन इज इन’ या सूत्रावर मोदी सरकारचा विश्वास आहे. करप्रणालीबद्दल काही प्रश्न आहेत, वितरण व्यवस्थेबद्दल प्रश्न आहेत. पण या प्रश्नांमुळे मोदी सरकार सत्तेवर आले. आता एकच मंत्र आहे. तो म्हणजे विलंब टाळून वेगाने निर्णय घेणे. उद्योगांमध्ये अडथळे निर्माण करणे हे सरकारचे काम नसते. तर उद्योजकांना प्रोत्साहन देणे, त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे हेच सरकारचे काम असते, यावर आमचा विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. कोणताही निर्णय घेताना नागरिकांचे कल्याण करण्याची भूमिका असली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.