भिलदी (गुजरात) : ‘शेवटच्या श्वासापर्यंत भारतीयांची सेवा करण्याच्या कटिबद्ध आहे,’ याचा शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील कार्यक्रमात पुनरुच्चार केला. विशेष म्हणजे गुजरातमधील बनासकाठा जिल्ह्यातील पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांत ‘मोदी कही नही जाएगा’ अशा घोषणांनी मोदी समर्थकांनी विरोधकांना उत्तर दिले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी काही दिवसांपूर्वी पाटणा येथील कार्यक्रमात ‘मोदी का बाप भी जाएगा’ असे विधान केल्याने राजकीय वादंग निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या जाहीर कार्यक्रमांसाठी त्यांच्या समर्थकांनी आता ही नवीन घोषणा तयार केल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले.
गुजरातमधील कार्यक्रमांमध्ये १४ हजार कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच ‘पीएम-किसान’चा २४व्या हप्त्याचे मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, ‘मोदी कही नही जाएगा’ ही घोषणा बनासकाठातील गावापासून काश्मीर-कन्याकुमारीपर्यंत सर्व देशात दुमदुमली आहे. मुळात १४० कोटी भारतीय नागरिक आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील दृढ संबंध काँग्रेस वा त्यांचे मित्र पक्ष वा कोणीही तोडू शकणार नाही. अगदी पाटण्यातील कार्यक्रमानंतर खरगे यांना एका सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याने ‘मोदी कही नही जाएगा’ असे सांगत हीच देशवासियांची भावना असल्याचे स्पष्ट केले होते, असेही संघवी यावेळी म्हणाले.
चौकट पंतप्रधानांचा रोड शो
गुजरातमधील भिलदी शहरात पंतप्रधान मोदी यांचा रोडशो झाला. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभ्या नागरिकांनी हातातील फलकांवर ‘जब तक भारत विकसित नही होगा, मोदी कही नही जाएगा’, अशा घोषणा लिहून आपल्या नेत्याला पाठिंबा दर्शवला. ‘जोपर्यंत भारत आत्मनिर्भर होत नाही, तोपर्यंत मोदी कुठे जाणार नाही’, ‘जोपर्यंत भारत जगातील अव्वल अर्थसत्ता होत नाही, तोपर्यंत मोदी कुठे जाणार नाही’, असेही काही पलकांवर लिहिले होते. काही ठिकाणी नागरिकांनी त्यांचे या घोषणा देऊन स्वागत केले.
कोट देश संकटात असताना विरोधी पक्ष आनंद साजरा करत आहेत. पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या कठिण परिस्थितीत खते व स्वयंपाकाच्या गॅसच्या उपलब्धतेबाबत सामान्य लोकांमध्ये भीती पसरवत आहेत. मात्र या परिस्थितीतही शेतकरी, तरुण आणि महिला ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी काम करत आहेत, परंतु काही लोकांना देशाची ही प्रगती पाहवत नाही. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
