पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातमधल्या बनासकांठा इथल्या भारत बोव्हन ब्रीडिंग अँड रिसर्च सेंटरला भेट दिली. या भेटीला राजकीय स्वरुप प्राप्त झालं. पंतप्रधानांबरोबर फोटो काढल्यानंतर उपस्थित महिलांनी ‘मोदी कही नही जाएंगे’चा नारा दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींसंदर्भात काढलेले उद्गार वादग्रस्त ठरले आहेत. खरगे यांच्या वक्तव्याचा भाजपाकडून जोरदार समाचार घेण्यात येत आहे.
बिहारच्या पाटणा येथे बिहारचे पहिले मुख्यमंत्री श्री कृष्ण सिंह यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कार्यक्रमात मल्लिकार्जुन खरगे यांचं भाषण सुरू होतं. तेवढ्यात “मोदी नहीं जाएगा” असं विधान उपस्थितांमधून ऐकू आलं. संतोष कुमार नावाच्या व्यक्तीने असं विधान केलं. मल्लिकार्जुन खरगे यांनी आधी शांतपणे ऐकून घेतलं. परंतु, नंतर ते रागात म्हणाले की, मोदींचा बापही जाईल. हे विधान त्यांनी दोनदा केलं. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, मोदी नहीं जाएगा असं म्हणणाऱ्याला उपस्थितांनी पकडून ठेवलं. काँग्रेस समर्थकांकडून त्याला मारहाण करण्यात आली.
“सर्व भारतविरोधी शक्तींना सांगू इच्छित आहोत की, मोदी कुठेही जाणार नाहीत”, असं भाजपाने व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं आहे. दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या ‘मोदी का बाप भी जाएगा’ या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर भाजपाने विरोधकांना लक्ष्य करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
या विधानाचा व्हिडिओ व्हायरल होताच भारतीय जनता पक्षाने (भाजपा) खरगे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. खरगेजी यांचं असं घृणास्पद, उद्धट आणि असंस्कृत वर्तन काँग्रेसमधील वाढती निराशा दर्शवते. आंदोलनाच्या नावाखाली अराजकता निर्माण करण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत’, असं भाजपा प्रवक्ते तुहिन ए सिन्हा यांनी म्हटलं.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, “मला वाटायचं की फक्त राहुल गांधी मूर्ख आहेत. पण आता असं दिसते आहे की तिथे अशा लोकांचा संपूर्ण गटच आहे.” मोदी “किमान आणखी ३० वर्षे सत्तेत राहतील”, असा दावाही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, “नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचा अपमान केल्याबद्दल भारतातील जनता काँग्रेस आणि नेहरू-गांधी घराण्याला योग्य ते उत्तर देईल.”
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, खरगे हे दलित समाजाचे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा बाप काढला. त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन करता येणार नाही. कुणाचाही बाप काढणे योग्य नाही. पुढील निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीत येतील, असे सभेत कार्यकर्ता म्हणत होता. ते बरोबरच आहे. २०२९ च्या निवडणुकीतही प्रधानमंत्री मोदीच असतील. मोदीच बाप आहे आणि तेच सत्तेत येतील, असे आठवले म्हणाले. समोर चार राज्यांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकाही आम्हीच जिंकू, असे ते म्हणाले.
