PM Narendra Modi And French President Emmanuel Macron Funny Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात सुरू झालेला उबदार संवाद काही क्षणांत जागतिक विनोदाच्या क्षणात रूपांतरित झाल्याचे पाहायला मिळाले होते. १७ जून रोजी कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या जी-७ शिखर परिषदेच्या दरम्यान मॅक्रॉन यांची भेट घेत असताना, पंतप्रधान मोदींनी सहज टिप्पणी केली, “आजकाल तुम्ही ट्विटरवर भांडत आहात?” या विनोदानंतर मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी, दोघेही हसू लागले आणि क्षणभरासाठी भू-राजकीय चर्चेचा सूर विनोदाकडे वळला.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यातील विनोदी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही तासांतच व्हायरल झाला. यानंतर एक्स, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील युजर्सनी पंतप्रधानांच्या या विनोदाचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी काही युजर्सनी पंतप्रधान मोदी यांची विनोदी टप्पणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मॅक्रॉन यांच्यावर केलेल्या टीकेशी जोडली.
पार्श्वभूमी
नियोजित वेळापत्रकाच्या एक दिवस आधीच जी-७ शिखर परिषद सोडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मायदेशी परतले होते. यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये शस्त्रविरामाचा प्रस्ताव दिला होता, त्यामुळे ते अमेरिकेत परतल्याचे म्हटले होते.
प्रसिद्धी मिळवण्यासाठी मॅक्रॉन…
फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या या दाव्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला होता. ट्रूथ सोशलवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले होते की, “प्रसिद्धी मिळवण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी चुकून असे म्हटले की, मी कॅनडामधील जी-७ शिखर परिषदेतून इस्रायल आणि इराणमधील शस्त्रविरामासाठी अमेरिकेला परतलो आहे. पण, हे चुकीचे आहे. मी आता वॉशिंग्टनला का आलो आहे, हे त्यांना माहित नाही. परंतु त्याचा शस्त्रविरामाशी निश्चितच काहीही संबंध नाही. त्याहूनही महत्त्वाचे, मुद्दाम असो वा नसो, इमॅन्युएल नेहमीच चूक करतात.”
काय म्हणाले होते मॅक्रॉन?
तत्पूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दावा केला होता की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणला शस्त्रविरामाचा प्रस्ताव दिला आहे.
“खरोखरच भेटीचा आणि चर्चेचा प्रस्ताव आहे. विशेषतः शस्त्रविराम करण्यासाठी आणि नंतर व्यापक चर्चा सुरू करण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला होता. आता आपल्याला पहावे लागेल की, दोन्ही देश त्याचे पालन करतील का”, असे मॅक्रॉन यांनी जी-७ शिखर परिषदेत पत्रकारांशी बोलताना म्हटले होते.