पक्षांतर्गत कलहापायी पाच वर्षांपूर्वी पराभव पत्कराव्या लागलेल्या वसुंधरा राजे यांनी राजस्थानात सत्ता काबीज करून राज्यातील आपले नेतृत्व आणि वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ग्वाल्हेरच्या शिंदे राजघराण्यात जन्मलेल्या आणि लग्नगाठीनंतर राजस्थानची सून झालेल्या वसुंधरा राजे या वयाची साठी ओलांडत असतानाच पुन्हा मुख्यमंत्रिपदी आरूढ होत आहेत.
 ‘इंग्रजाळलेली महाराणी’ अशी त्यांची संभावना विरोधकांनी केली तरी २००३च्या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला आणि त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीही झाल्या. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या इथपासून ते राजस्थानातील बिनीच्या नेत्या; इथपर्यंतचा त्यांचा हा प्रवास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे आणि त्यांच्यातील इच्छाशक्तीचे दर्शन घडविणारा आहे. मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राची पदवी घेतलेल्या वसुंधरा राजे यांची प्रशासनावरही चांगलीच पकड असल्याचे त्यांच्या राजवटीत दिसून आले होते. तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्या तीन वेळा विधानसभेवर आणि पाच वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत.
राजस्थानमध्ये सत्ता परिवर्तन होईल अशी अपेक्षा मतदानोत्तर चाचण्यांमधून वक्त केला जात असला तरी भाजपला इतके अभूतपूर्व यश मिळेल, अशी अपेक्षा खुद्द त्या पक्षाच्या नेत्यांना नव्हती. इतके भरभरून दान राजस्थानमधील मतदारांनी भाजपच्या पदरात टाकले. राजस्थानच्या इतिहासात काँग्रेसचा हा दारुण पराभव आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या २० सभाही भाजपच्या विजयात हातभार लावणाऱ्या ठरल्या.
एकूण १९९ पैकी १६० जागा भाजपने जिंकल्या. विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी क्रमांक दोनच्या पक्षाला २० जागा हव्या आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसने जेमतेम २१ जागा जिंकल्या. त्यामुळे राज्यात काँग्रेसचा इतका दारुण पराभव झाला की जेमतेम विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडण्याची नामुष्की त्या पक्षावर ओढवली. काँग्रेसच्या मागे परंपरागत असलेल्या जाट समुदायाने या वेळी पाठ फिरवली तेही एक पराभवाचे कारण ठरले. भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार वसुंधरा राजे झालरपाटण मतदारसंघातून ६० हजार ८९६ मतांनी विजयी झाल्या. वसुंधरा राजे यांनी विजयाचे श्रेय मोदींना दिले आहे. गेहलोत सरकारमधील अनेक मंत्र्यांचा दारुण पराभव झाला आहे. त्यामध्ये पर्यटन मंत्री बीना काक, महसूलमंत्री हेमरम चौधरी आणि शांती धारीवाल हे मंत्री पराभूत झाले. बारमरधील पचपंद्रा येथे तेल शुद्धिकरण कारखाना आणल्याचा प्रचार काँग्रेसने मोठय़ा प्रमाणात केला होता. मात्र पचपंद्रासह जिल्ह्य़ातील बहुतेक सर्व जागा भाजपने पटकावल्या. मोदी आणि वसुंधरा राजे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत वेगळी रणनीती आखली ती कामी आल्याचे निकालातून दिसले. वसुंधरा राजे यांनी सुराज्य संकल्प यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरा काढल्याचे फळही पक्षाला मिळाले.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण चतुर्वेदी यांनी सिव्हिल लाइन्स मतदारसंघातून विजय मिळवला. गोपाळगड येथील २०११च्या जातीय दंगलीमुळे अल्पसंख्याक समाज काँग्रेसवर नाराज होता. त्याचा फटका कमनमध्ये काँग्रेसला बसला. तेथे भाजप उमेदवार जगतसिंह यांनी काँग्रेसच्या झहीदा खान यांचा पराभव केला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार गुलाबचंद कटारिया यांनी उदयपूरमध्ये विजय मिळवला. निवडणुकीच्या शेवटच्या वर्षांत काँग्रेसने अनेक लोकप्रिय योजना आणल्या. विशेषत: मोफत औषधे, निवृत्तिवेतन अशा योजना आणल्या. मात्र त्याचा विशेष प्रभाव पडला नाही. काँग्रेसच्या सभांना तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला. विधानसभा अध्यक्ष दीपेंद्र सिंह सिक्कर जिल्ह्य़ातील श्रीमाधोपूर मतदारसंघातून विजयी झाले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सदरपुरा मतदारसंघातून भाजपच्या शंभूसिंह खेतासार यांचा १८ हजार ४७८ मतांनी पराभव केला. किरोलीलाल मीणा यांच्या नॅशनल पीपल्स पक्षाचा मोठा गवगवा झाला होता. भाजप आणि काँग्रेसच्या अनेक बंडखोरांनी या पक्षातून उमेदवारी मिळवली होती. मात्र त्या पक्षाला केवळ तीन जागाच मिळाल्या.
राजस्थान
भाजपचे उपमुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार गुलाबचंद कटारिया यांनी उदयपूरमधून काँग्रेसचे दिनेश श्रीमली यांना धूळ चारली.
भाजपचे जगत सिंग हे कमन या मुस्लीमबहुल मतदार संघातून काँग्रेसच्या जयदा खान यांना ३४०० मतांनी पराभूत करून विजयी.
* पर्यटन मंत्री बिना काक (काँग्रेस) सुमेरपूर मतदारसंघातून भाजपच्या मदन राठोड यांच्याकडून ४२ हजार ६४३ मतांनी पराभूत
* काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चंद्रभान (काँग्रेस) मांडवा १७ हजार ११८ मतांनी अपक्ष नरेंद्र कुमार यांच्याकडून पराभूत

एकूण जागा २००
              २०१३    २००८    
भाजप     १६२     ७८    
काँग्रेस     २१     ९६    
एनपीपी     ४     –
इतर        १२       २०
२०० राजस्थानातील मतदारसंघ
१०३महिला उमेदवार
०७ विजयी महिला!

“राजस्थानमध्ये भाजपच्या मोठय़ा विजयाचे श्रेय आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहे. जनता काँग्रेसच्या कारभाराला कंटाळली होती. नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या विकासाचे प्रारूप पुढे आणले आहे. ते इतर राज्यांतही आणता येईल पक्ष कार्यकर्त्यांच्याही मेहनतीचे केली. भाजपशासित अनेक सुशासन देऊन आपला कारभार दाखवून दिला आहे.”
वसुंधराराजे, भाजप प्रदेशाध्यक्ष

“राजस्थान सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या, मात्र विरोधकांनी खोडसाळ प्रचार केला तोच भोवला. त्या योजना केवळ निवडणुकीच्या काळातच आणल्या असे वातावरण निर्माण करण्यात विरोधकांना यश आले. तसेच विकास योजनांची माहिती जनतेपुढे नेण्यात अपयश आले. सरकारच्या विरोधात अनेक खोटे आरोप करण्यात आले.”
अशोक गेहलोत, मुख्यमंत्री,राजस्थान

गेहलोत यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
आपल्या लोकप्रिय घोषणांच्या जोरावर ६२ वर्षीय अशोक गेहलोत यांना पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्वास होता. १९९८ मध्ये गांधी घराण्याशी असलेल्या जवळिकीमुळे त्यांना पहिल्यांदा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद मिळाले. जाट नेते परशुराम मदरेणा त्यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत होते, मात्र गेहलोत यांनी त्यांना मागे टाकले. २००८ मध्ये पुन्हा गेहलोत यांचे नशीब फळफळले. त्यावेळी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जाणारे सी.पी. जोशी पराभूत झाले. जोशी हे राहुल गांधी यांच्या विश्वासातील मानले जातात. उत्तम वक्तृत्व किंवा वसुंधरा राजे यांच्यासारखे वलय नसले, तरी इतर मागासवर्गीय समाजाचे नेते असलेल्या गेहलोत यांची स्वच्छ प्रतिमा त्यांना नेहमी तारून गेली. ते उत्तम प्रशासक मानले जातात. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही गेहलोत यांचे कौतुक केले आहे. मात्र आता दारुण पराभवाने गेहलोत यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुस्लीमबहुल कमनमध्ये भाजपला यश

काँग्रेसचे माजी नेते नटवरसिंह यांचे पुत्र आणि भाजप उमेदवार जगत सिंह यांनी कमन या मुस्लीमबहुल मतदारसंघामध्ये आश्चर्यकारक विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या झहीदा खान यांचा पराभव केला. या मतदारसंघात ७० टक्के मुस्लीम मतदार आहेत. राजस्थानमध्ये भाजपच्या लाटेत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. त्यातून हा मतदारसंघही सुटला नाही.