‘‘संशोधनाचा वापर हा कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी झाला पाहिजे. प्रयोगशाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, तर त्यांचे उत्पन्नही वाढेल आणि देशाची अन्नची गरज पूर्ण होईल,’’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) ८६व्या स्थापन दिवसानिमित्त मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लॅब टू लँड (प्रयोगशाळेतून शेताकडे) ही घोषणा दिली.
कमी जमीन आणि कमी वेळ वापरून जास्त कृषी उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे सांगत मोदींनी हवामान बदल आणि संपत चाललेली नैसर्गिक साधने याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्व देशाला अन्न कसे देता येईल आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न कसे मिळेल या दोन मुद्दय़ांचा विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
मोदी म्हणाले..
*हरितक्रांती व धवलक्रांतीच्या धर्तीवर मासेमारीच्या क्षेत्रात नीलक्रांती घडवून आणा.
*पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक (पर ड्रॉप मोअर क्रॉप) घेण्यासाठी भविष्यातील योजना आहे.
*भारत अजून खाद्यतेले व डाळींसाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यातही आपण स्वयंपूर्ण झाले पाहिजे.
*शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याशिवाय कृषीवाढीचे उद्दिष्ट साध्य होणार नाही, त्यामुळे सरकारची धोरणे त्याच दिशेने आखली जावीत.
*शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवावे. त्याच्या मदतीने त्यांची क्षमता वाढेल.