भारत-अमेरिकेचे नाते मजबूत, भरवशाचे आणि स्थायी स्वरूपाचे आहे. या मैत्रीबंधाची पूर्ण क्षमता अद्याप वापरलीच गेलेली नाही. भारतात स्थापन झालेले नवे सरकार हे नाते व मैत्री अधिक दृढ व व्यापक करण्याच्या दृष्टीने नैसर्गिक संधी आहे.., असे एकमुखी प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्रात लिहिलेल्या संयुक्त संपादकीयात केले आहे. उभय देशांच्या प्रमुखांनी एखाद्या वृत्तपत्रात संयुक्त संपादकीय लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दोन्ही देशांनी आपला संयुक्त प्राधान्यक्रम तयार करण्याची ही वेळ आहे. महत्त्वाकांक्षा आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पारंपरिक आणि नेहमीची उद्दिष्टे ओलांडून दोन्ही देश पुढे जाऊ शकतील, असा आशावाद दोन्ही नेत्यांनी या संपादकीयात व्यक्त केला आहे.
दोन्ही देशांना फलदायी ठरेल असे परस्पर संबंधांचे नवनवे मार्ग शोधल्याने तसेच व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये सहकार्य केल्याने भारताचे विकासाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यात आणि ‘जगाच्या विकासरथाचे इंजिन’ ही अमेरिकेची बिरुदावली साध्य करणे सुलभ होईल. जागतिक पातळीवरील सहकारी या नात्याने आपापल्या देशातील अंतर्गत सुरक्षा ध्यानात घेऊन परस्परांना गुप्त माहितीचे आदानप्रदान करणे, दहशतवादविरोधी यंत्रणेत समन्वय राखणे या महत्त्वाच्या गोष्टी असून आंतरराष्ट्रीय सागरी मार्गाचे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता अबाधित राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास या दोन्ही नेत्यांनी जागतिक समुदायाला तसेच आपापल्या देशबांधवांनाही दिला आहे.  
आमची सैन्यदले जमिनीवर, आकाशात तसेच समुद्रात संयुक्त सराव करीत आहेत. अवकाश कार्यक्रमात दोन्ही देश एकमेकांना अभूतपूर्व असे सहकार्य करीत आहेत, अशी माहिती या संपादकीयात देण्यात आली आहे. उभयपक्षी संबंधांमध्ये अमेरिकेतील भारतीय वंशाचा समुदाय बजावत असलेल्या ‘चैतन्यदायी’ योगदानाचा विशेष उल्लेखही संपादकीयात करण्यात आला आहे. ‘स्वच्छ भारत’ मोहिमेस अमेरिका पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासनही संपादकीयात आहे. दोन्ही देशांच्या सहकार्यातून दोघांचाही लाभ आहे. अमेरिकी गुंतवणुकीमुळे भारताचा विकास होत आहे तर भारत अधिक समृद्ध, अधिक सशक्त झाला तर अमेरिकेचा तसेच एकूण आंतरराष्ट्रीय समुदायाचाही लाभ आहे, असे यात निदर्शनास आणून देण्यात आले.

‘केम छो,’ मोदी!
‘केम छो, मि. मोदी.’ अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाइट हाऊसच्या प्रवेशद्वारात ‘गुजराती’ स्वागत केले. त्यानंतर मोदींच्या स्वागतासाठी व्हाइट हाऊसमध्ये भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडविण्यात आले. मोदींसाठी ‘गरबा’ नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.