पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱयातील १०० तासांमध्ये ५० हून अधिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, विविध लोकांशी संवाद साधणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला मोदी यांचा अमेरिका दौरा येत्या २६ सप्टेंबरपासून न्यूयॉर्कमधून सुरू होतो आहे. दौऱयामध्ये मोदी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार असून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्येही ते भाषण करणार आहेत.
अमेरिका दौऱयामध्ये मोदी यांचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असणार आहे. दौऱयातील वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करण्याच्या दृष्टीनेच पंतप्रधान कार्यालयाने संपूर्ण नियोजन केले आहे. या दौऱयामध्ये मोदी जगातील विविध नेत्यांना भेटणार आहेत. त्याचबरोबर फॉर्च्युन ५०० कंपनींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांशी ते संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांनाही मोदी भेटणार आहेत.
अमेरिकेतील उद्योगपतींना भेटून त्यांच्यासाठी ‘रेड कार्पेट’ टाकण्याचेच आपल्या सरकारचे धोरण आहे. या कंपन्यांना लालफितीच्या कारभाराला भारतात सामोरे जावे लागणार नसल्याचा विश्वास देण्याचे कामही मोदी करतील. जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक भारतात आणण्याकडेही मोदी यांचा कल असणार आहे.