UNGA : मोदींनी जगाला सांगितली भारतीय लोकशाहीची ताकद, म्हणाले…

पंतप्रधान मोदींनी हे सांगताना स्वत:चे देखील उदाहरण दिले; जाणून घ्या काय सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त राष्ट्र महासभेतील ७६ व्या सत्राला संबोधित केलं. या महासभेतून त्यांनी विविध विषयांवर मतं माडलं. तसेच, संपूर्ण जगाला भारतीय लोकशाहीची ताकद देखील सांगितली. हे सांगताना पंतप्रधान मोदी यांनी स्वतःचं उदाहरण देखील दिलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “मागील दीड वर्षापासून संपूर्ण जग १०० वर्षात आलेल्या सर्वात मोठ्या महामारीला तोंड देत आहे. अशा भयंकर महामारीत जीव गमवाणाऱ्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. मी त्या देशाचं प्रतिनिधित्व करत आहे, ज्याल लोकाशाहीची जननी असं संबोधतात. लोकशाहीची आमची हजारो वर्षांची महान परंपरा आहे. या १५ ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश केला. आमची विविधता आमच्या सशक्त लोकशाहीची ओळख आहे. एक असा देश ज्यामध्ये अनेक भाषा आहेत, शेकडो बोली आहेत. विविध प्रकारचे रहाणीमान, खानपान आहे. हे सशक्त लोकशाहीचं उत्तम उदाहरण आहे. ”

UNGA: “दहशतवाद त्यांच्यासाठीही धोकादायक ठरणार”; पाकिस्तानचं नाव न घेता पंतप्रधान मोदी यांचा इशारा

तसेच,“ही भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. एक छोटा मुलगा जो कधीकाळी एका रेल्वेस्टेशनच्या चहाच्या टपरीवर आपल्या वडिलांची मदत करत होता. तो आज चौथ्यांदा भारताचा पंतप्रधान म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेस संबोधित करत आहे. सर्वाधिक काळ गुजरातचा मुख्यमंत्री आणि मागील सात वर्षांपासून भारताचा पंतप्रधान म्हणून मला सरकारचे नेतृत्व या भूमिकेत देशवासियांची सेवा करताना, २० वर्षे होत आहेत.” असं मोदी यांनी यावेळी बोलून दाखवलं.

याचबरोबर “ विकास सर्वसमावेशी, सर्वस्पर्शी, सर्वव्यापी, सर्वपोषक व्हावा हीच आमची प्राथमिकता आहे. मागील सात वर्षांमध्ये भारतात ४३ कोटींपेक्षा जास्त लोकांना बँकींग व्यवस्थेशी जोडलं गेलं आहे. जे आतापर्यंत यापासून वंचित होते. आज ३६ कोटींपेक्षा अधिक अशा लोकांना देखील विमा सुरक्षा कवच मिळाले आहे, जे पूर्वी याबाबत विचार देखील करू शकत नव्हते. ५० कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत उपचाराची सुविधा देऊन, भारताने त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधांशी जोडलं. भारताने तीन कोटी पक्की घरं तयार करून, बेघर कुटुंबाना घर मालक बनवलं. ” असं देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

“ प्रदूषित पाणी भारतच नाही, संपूर्ण जग विशेषकरून गरीब व विकसनशील देशांसाठी फार मोठी समस्या आहे. भारतात या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही १७ कोटींपेक्षा अधिक घरांपर्यंत पाईपद्वारे स्वच्छ पाणी पोहचवण्याचं मोठं अभियान राबवत आहोत. जगभरातील मोठ-मोठ्या संस्थांनी हे मान्य केलं आहे, की कोणत्याही देशाच्या विकासासाठी तेथील नागरिकांजवळ जमीन व घराचे मालकी हक्क असणे अत्यंत गरजेचं आहे. जगभरातील मोठ-मोठ्या देशांमध्ये मोठ्यासंख्येत असे लोक आहेत, ज्यांच्याकडे जमिनी व घरांचे मालकी हक्क नाहीत. आज आम्ही भारताच्या सहा लाखांपेक्षा अधिक गावांमध्ये ड्रोनद्वारे मॅपिंग करून कोट्यावधी लोकांना त्यांचे घर आणि जमिनीचे डिजिटल रेकॉर्ड देत आहोत. हे डिजिटल रेकॉर्ड प्रॉपर्टीवरील वाद कमी करण्याबरोबरच बँक कर्जापर्यंत लोकांची पोहच वाढवत आहे. ” अशी माहिती यावेळी मोदींनी आपल्या भाषणातून दिली.

याचबरोबर, पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला इशारा देखील दिला. दहशतवादावरून त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. अफगाणिस्तानच्या भूमिचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी करू नये असं त्यांनी यावेळी सांगितलं. मागच्या वर्षी महासभेचं सत्र करोनामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Modi told the world about the strength of indian democracy msr

ताज्या बातम्या