पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दोन दिवसीय दौऱयात सोमवारी कुख्यात दाऊद इब्राहिमला अडचणीत आणण्याच्या दृष्टीने संयुक्त अरब अमिरातीच्या संबंधित नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारताला हवा असलेल्या दाऊद इब्राहिमचे बळ कमी करण्यासाठी दुबईतील त्याच्या संपत्तीवर जप्ती आणण्यासाठी नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीकडे मागणी करणार असल्याचे समजते. मोदी व्यापार व दहशतवाद विरोधात उपाययोजनांसदर्भात त्या देशाच्या नेत्यांशी सोमवारी चर्चा करणार आहेत. दुबईतील दाऊदच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी मोदी पुरावा म्हणून दाऊदच्या मालमत्तेची यादी तेथील नेत्यांपुढे सादर करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दौऱयाच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदींनी अबुधाबीतील ऐतिहासिक शेख झायेद मशिदीला भेट दिली. ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी मशीद आहे. या वेळी मोदींनी मशिदीच्या नक्षीकामाची बारकाईने पाहणी केली. संगमरवरी कलाकृती असलेली ही जगातील सर्वात मोठी मशीद समजली जाते. या वेळी मोदी म्हणाले की, या संस्मरणीय ठिकाणाला भेट दिल्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे. मशिदीवरील नक्षीकाम आणि कलाकृती कोणालाही भुरळ पाडणारी आहे. जगातील सर्वात नमुनेदार नक्षीकामाचे उदाहरण या कलाकृती सामावलेले आहे. मानवी कलेचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. ही मशीद म्हणजे शांतता आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे.