गुजरातमध्ये २००२ साली उसळलेल्या दंगलीच्या काळात नरेंद्र मोदींनी मौन बाळगलं होतं असा उल्लेख आसाममधील १२ वीच्या पुस्तकात करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींवर टीका केल्याप्रकरणी पोलिसांनी पुस्तकाच्या लेखकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तीन जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातमध्ये दंगल उसळली होती तेव्हा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते. गोलघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुस्तकातील पान क्रमांक ३७६ वर नरेंद्र मोदींचा उल्लेख आहे. राज्यात दंगल उसळली असताना नरेंद्र मोदींनी मौन बाळगलं. 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा रेल्वेस्थानकावर साबरमती एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लावून 59 कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले होते. त्यानंतर गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठी जातीय दंगल उसळली होती. दंगलीत जवळपास १००० लोकांनी आपला जीव गमावला होता असं पुस्तकातून सांगण्यात आलं आहे.

ज्या तीन लेखकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांची नावे दुर्गा कांता शर्मा, रफीक आणि मनश प्रोतीम बरुआह अशी आहेत. शर्मा यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. हे पुस्तक 2011 पासून विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहे.

सौमित्र गोस्वामी आणि मानव ज्योती बोरा यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुस्तक विक्रीवर तात्काळ बंदी घातली गेली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. नरेंद्र मोदींना विशेष तपास पथकाकडून क्लीन चिट मिळाली असतानाही विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. लेखकांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले असून पुस्तकात नरेंद्र मोदींविरोधात काहीही आक्षेपार्ह लिहिलं नसल्याचं सांगितलं आहे.