Swearing-in Ceremony of Bangladesh Nationalist Party (BNP) chief Tarique Rahman : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चे प्रमुख तारिक रहमान यांच्या १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत नियोजित दौरा आहे. त्यामुळ ते बांगलादेशातील पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जाणार नाहीत. मात्र, भारत सरकारकडून एका महत्त्वाच्या नेत्याला बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे.

भारताचे प्रतिनिधी म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवण्यात येणार आहे. भारत सरकारने रविवारी हा निर्णय घेतला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने बांगालदेशचे आगामी पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधी कार्यक्रमाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले होते. परंतु त्याच दिवशी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मुंबईत येणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नियोजित आहे. मॅक्रॉन आणि मोदी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी द्विपक्षीय बैठकांसाठी भेटतील, त्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ साठी दिल्लीला जाणार आहेत.

बांगलादेशकडून १३ देशांना आमंत्रण

बीएनपीने सांगितले की अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस यांनी १३ देशांच्या सरकार प्रमुखांना आमंत्रित केले आहे. आमंत्रित देशांच्या यादीत चीन, सौदी अरेबिया, भारत, पाकिस्तान, तुर्की, संयुक्त अरब अमिराती, कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान यांचा समावेश आहे.

शपथविधी कार्यक्रम कसा असेल?

बांगलादेश संसदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी १७ फेब्रुवारी रोजी सकाळी होईल आणि रहमान व मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी संध्याकाळी होईल. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले की, “लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे १७ फेब्रुवारी २०२६ रोजी ढाका येथे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या नवनिर्वाचित सरकारच्या शपथविधी समारंभात भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतील”.

त्यात म्हटले आहे की, “या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होणं म्हणजे भारत आणि बांगलादेशच्या लोकांमधील खोल आणि चिरस्थायी मैत्री अधोरेखित करतो, आपल्या दोन्ही राष्ट्रांना बांधणाऱ्या लोकशाही मूल्यांप्रती भारताच्या दृढ वचनबद्धतेची पुष्टी करतो.”

“शेजारी असलेले आणि सामायिक इतिहास, संस्कृती आणि परस्पर आदराने एकत्रित असलेले देश म्हणून, भारत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या सरकारकडे बांगलादेशच्या सत्तांतराचे स्वागत करतो, ज्यांच्या दृष्टिकोनाला आणि मूल्यांना जनतेचा प्रचंड जनादेश मिळाला आहे”, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.