मोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादाला तर घाबरता; नवाब मलिकांचा पलटवार

नगरच्या सभेत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद दिखावा असल्याचे म्हटले होते. याला राष्ट्रवादीने उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद काढता परंतू मोदीजी याच राष्ट्रवादाला तर तुम्ही घाबरत आहात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला आहे. नगरच्या सभेत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद दिखावा असल्याचे म्हटले होते. याला राष्ट्रवादीने उत्तर दिले आहे.

मलिक म्हणाले, तुमचा राष्ट्रवाद हा हेडगेवार, गोळवळकर गुरुजींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. यामध्ये एका विशेष वर्गाला, विशेष जातीच्या लोकांना स्थान आहे. इतर लोकांना स्थान नाही. आमचा राष्ट्रवाद हा शाहू, फुले, आंबेडकर, महात्मा गांधी, मौलाना आझाद यांचा राष्ट्रवाद आहे.

आमच्या राष्ट्रवादामध्ये सर्व लोकांना घेवून जाण्याचा विचार आहे. तर तुमचा राष्ट्रवाद हा मनुवादी विचारांनी भारलेला आहे. आमचा राष्ट्रवाद समता स्थापन करणारा आहे. राष्ट्रवादीच्या याच राष्ट्रवादाच्या ताकदीवर या देशातील लोकांना ताकद मिळाली आहे. आपण विशेष वर्गाला ताकद देणार्‍या वर्गाची वकिली करीत आहात. त्यामुळे तुमच्या राष्ट्रवादासमोर आमचा राष्ट्रवाद कमजोर पडणार नाही. आमच्या राष्ट्रवादाच्या माध्यमातून आम्ही खोटया राष्ट्रवादाला उखडून टाकू, असे मलिक म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Modiji you are afraid of our nationalism nawab maliks reversal