विधानसभा निवडणुकीनिमित्तच्या प्रचारसभांत काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर टीकेचे वार करण्याची प्रथा गुरुवारीही पाळली. त्यात विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी गुलबग्र्यात होत्या तर भाजपचे वलयांकित प्रचारक नरेंद्र मोदी हे मंगळूरमध्ये होते.नरेंद्र मोदी प्रचारसभांमध्ये आमच्यावर टीका करत आहेत, मात्र त्यांची ही नेहमीची शाब्दिक चलाखी येथे चालणार नाही, कर्नाटकची जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांनी मोदी व भाजपला बंगळुरूत लक्ष्य केले. भाजप सरकारने कर्नाटकाची मोठय़ा प्रमाणात लूट केली असून, विविध योजनांसाठी केंद्राकडून राज्याला देण्यात आलेल्या निधीचे काय झाले, असा सवाल करीत राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी गुलबर्गा येथे केला.
तर काँग्रेस बरखास्त करा
आपण गांधीवादी आहोत, या राहुल गांधी यांच्या विधानाचा नरेंद्र मोदी यांनी मंगळूर येथील सभेत समाचार घेतला. महात्मा गांधी हे आपले आदर्श असून आपण पक्के गांधीवादी आहोत, असे राहुल गांधी वारंवार सांगत आहेत, असे असेल तर स्वत: गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करण्याची सूचना केली होती. राहुल अथवा काँग्रेसचे अन्य वरिष्ठ नेते गांधीजींची ही इच्छा कधी पूर्ण करणार, याची आम्ही वाट पाहत आहोत, अशी बोचरी टीका मोदी यांनी केली. या सभेत त्यांनी राहुल यांची संभावना ‘गोल्डन स्पून’ (तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला) अशी केली.