Moga SHO Sunita Bawa bribery arrest : पंजाब येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेकोट इसा खान पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक (SHO) सुनीता बावा आणि त्यांचा बंदूकधारी होमगार्ड जवान गुरअवतार सिंग यांना ५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. मात्र, या कारवाईपेक्षाही अटक झाल्यानंतर या महिला अधिकाऱ्याची निर्ढावलेली वृत्ती आणि तिने दिलेली धक्कादायक विधाने समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली असून, त्यामुळे या प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कोट इसा खान पोलिसांनी नुकतीच खोसा रणधीर येथील एका रहिवाशाला अंमली पदार्थांसह अटक केली होती. याच गुन्ह्याचा आधार घेत पोलीस निरीक्षक सुनीता बावा यांनी नूरपूर हाकिमियाँ गावातील रहिवासी राजविंदर सिंग याला ड्रग्ज तस्करीच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि पैशांची मागणी सुरू केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला अधिकाऱ्याने आधीच ५० हजार रुपये घेतले होते आणि आणखी ५० हजार रुपयांची मागणी ती करत होती.

राजविंदर सिंग यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फिरोजपूर रेंजचे निरीक्षक गगनदीप कौर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. विजिलन्सच्या पथकाने शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास झिरा रोडवर सापळा रचून अधिकृत साक्षीदारांच्या उपस्थितीत या महिला अधिकाऱ्याला आणि तिच्या बंदूकधाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. सुनीता बावा या आधीपासूनच विजिलन्सच्या रडारवर होत्या, असं सांगण्यात येत आहे.

“ऑल इज वेल!”… व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर या महिला पोलीस निरीक्षकाचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अटक करून नेत असताना जेव्हा पत्रकारांनी तिला प्रश्न विचारले, तेव्हा तिने अत्यंत निर्भयपणे आणि हसतमुख चेहऱ्याने उत्तर दिलं, “ऑल इज वेल, ऑल इज वेल” (सगळं काही ठीक आहे).

लाचेच्या आरोपांबाबत विचारलं असता, तिने हसत हसत म्हटलं, “हे बघा, आता तुरुंगाचे एक नवीन मॉड्यूल सुरू झाले आहे, बघूया पुढे काय होतेय.” इतकंच नव्हे तर, अशा परिस्थितीतही तुम्ही कशा हसत आहात, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर तिने अत्यंत उद्धटपणे सांगितलं, “नक्कीच, माणसाने नेहमी खंबीर राहिलं पाहिजे. आयुष्यात असे चढ-उतार येतच असतात, काही हरकत नाही. चांगल्याची आशा ठेवा (होप फॉर द बेस्ट).”

या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तीव्र संताप आणि चर्चा सुरू झाली आहे. नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी या महिला अधिकाऱ्याच्या निर्ढावलेल्या आणि उद्दाम वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर काहींनी सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थेवर कडाडून टीका केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.