पंजाबमधील मोहाली येथे एका खाजगी कंपनीच्या कार्यालयात गुरूवारी सध्यांकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका ३० वर्षीय महिलेची तिच्याच जुन्या प्रियकरीने आणि सहकाऱ्याने कार्यालयातील इतर कर्मचार्यांसमोर चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. या जीवघेण्या हल्ल्यानंतर आरोपीने स्वत:लाही संपण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
प्रेमसंबंध संपल्याने होता त्रस्त
प्राथमिक तपासानुसार, मृत तरुणी डिंपल आणि आरोपी हरजिंदर सिंग मान हे दोघेही मोहालीतील एका खाजगी कुरिअर कंपनीत एकत्र काम करत होते. सोबत काम करत असताना त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. मात्र, काही काळापूर्वी त्यांच्यातील नाते संपुष्टात आले होते आणि त्यांचा ब्रेकअप झाला होता.
‘एनडीटीव्ही’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हरजिंदरला हे ब्रेकअप सहन होत नव्हते. तो डिंपलसोबत पुन्हा नाते जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होता. मात्र, डिंपलने त्याला नकार दिला होता. यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून हरजिंदर प्रचंड मानसिक आणि भावनिक तणावाखाली होता.
कार्यालयातच केला खुनी हल्ला
गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कंपनीच्या कार्यालयात या दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की, हरजिंदरने रागाच्या भरात चाकू काढून डिंपलवर एकामागून एक अनेक वार केले. कार्यालयातील इतर सहकाऱ्यांनी मध्ये पडत डिंपलला वाचवण्याचा आणि हरजिंदरला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. डिंपल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर, हरजिंदरने त्याच चाकूने स्वतःवरही वार केले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला.
सहकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; पोलीस तपास सुरू
कार्यालयात अचानक घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे तिथे उपस्थित कर्मचारी प्रचंड हादरले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच रात्री ७:४० च्या सुमारास फेज-११ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी डिंपलला मृत घोषित केले. दुसरीकडे, आरोपी हरजिंदरची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फेज-११ पोलीस ठाण्याचे प्रभारी अमन बैदवान यांनी या घटनेत हरजिंदरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. डिंपलच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, तिचे आई-वडील आल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
पोलिसांनी घटनास्थळ सील केले असून फॉरेन्सिक टीमने आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. तसेच, कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून, घटनेचा नेमका घटना क्रम आणि त्यामागचा हेतू स्पष्ट करण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवत आहेत.
