वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘बातम्यांमधील तथ्य-तपासणारे संकेतस्थळ’ अशी ओळख असलेल्या ‘अल्ट न्यूज’ या वृत्तसंस्थेचे एक संस्थापक मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी धार्मिक भावना दुखावणे आणि द्वेषाला उत्तेजन दिल्याच्या आरोपाखाली अटक केली. चार वर्षांपूर्वीच्या एका ट्वीट संदेशाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.  एका ट्वीटर खातेदाराने केलेल्या तक्रारीच्या आधारे झुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. झुबेर यांनी एका विशिष्ट धर्माच्या दैवताचा अपमान करण्याच्या हेतूने एक आक्षेपार्ह छायाचित्र ट्वीटरवर २०१८च्या मार्चमध्ये प्रसारित केले होते, असे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (इफ्सो) या शाखेने त्यांना अटक केली. ट्वीटर खातेदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने, भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-ए (वेगवेगळय़ा समूहांमध्ये द्वेष पसरवणे) आणि २९५-ए (धार्मिक भावना भडकवण्याच्या हेतूने द्वेषमूलक कृत्ये करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झुबेर यांच्या अटकेनंतर लगेचच, ‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा यांनी ट्वीट संदेश प्रसारित केला. ‘‘जुबेर यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने २०२०च्या एका खटल्याच्या चौकशीसाठी बोलावले होते. या खटल्यात त्यांना आधीच उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले होते. मात्र, त्याला अन्य गुन्ह्यांप्रकरणी अटक केल्याची माहिती पोलिसांनी संध्याकाळी दिली. झुबेर यांना लावलेल्या कलमांनुसार त्यांना अटकेची सूचना देणे बंधनकारक होते. वारंवार विनंती करूनही पोलिसांनी ‘एफआयआर’ची प्रतही दिली नाही, असे सिन्हा यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.

२०२०च्या सप्टेंबरमध्ये एका ट्विटर खातेदाराच्या अपमानास्पद संदेशाला प्रतिसाद दिल्याच्या कारणास्तव झुबेर यांच्यावर ‘पोक्सो’ या कठोर  कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने मात्र त्यांच्यावर सक्तीने कारवाई करण्यास पोलिसांना मनाई केली होती.

पाहा व्हिडीओ –

झुबेर यांच्या अटकेवर काँग्रेसनेते जयराम रमेश यांनी ट्वीट केले. अल्ट न्यूज आणि झू बियर या संस्था विश्वगुरुंचे खोटे दावे उघड करण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सूड घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या दिल्ली पोलिसांनी व्यावसायिकता आणि विश्वास फार पूर्वीच गमावला आहे, अशी टीका रमेश यांनी केली. तर सत्याचा एक आवाज बंद केल्याने असे हजारो आवाज उठतील, अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली.

झुबेर कोण आहेत?

खोटय़ा बातम्यांमागील सत्य तपासून ते लोकांसमोर मांडण्यासाठी मोहम्मद झुबेर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर प्रतीक सिन्हा यांनी अल्ट न्यूज हे वृत्तसंकेतस्थळ २०१७मध्ये सुरू केले होते. झुबेर यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषितावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांवर  प्रकाश टाकला होता. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohamed zubair founder alt news arrested police under charge ysh
First published on: 28-06-2022 at 01:48 IST