Iran On America Ground Attack : अमेरिका आणि इराणमधील युद्धाला एक महिना झाला आहे. मात्र, अद्यापही हे युद्ध पूर्णपणे थांबलेलं नाही. दोन्ही देशातील युद्ध थांबवण्यासाठी सध्या हालचाली सुरू असल्या तरी काही अटी शर्तीमुळे दोन्ही देशांनी यावर सहमती दर्शवलेली नाही. अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थी करत असून यासाठी बैठका सुरू आहेत. मात्र, एकीकडे युद्ध थांबवण्यासाठी बैठका सुरू असताना दुसरीकडे अमेरिका इराणवर जमिनीवरून हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा दावा इराणने केला आहे.
राजनैतिक प्रयत्नांना न जुमानता अमेरिका गुप्तपणे जमिनीवरील आक्रमणाची योजना आखत आहे, असं इराणी संसदेच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे. मात्र, आम्ही कोणत्याही परिस्थितीत शरणागती पत्करणार नाही, असा इशाराही इराणी संसदेच्या अध्यक्षांनी अमेरिकेला दिला आहे.
इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी अमेरिकेबाबत मोठा दावा केला. मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी म्हटलं की,”इराणचे सशस्त्र दल अमेरिकेच्या संभाव्य जमिनीवरील आक्रमणासाठी सज्ज आहेत. अमेरिकेच्या प्रादेशिक मित्र राष्ट्रांनी इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईला पाठिंबा दिल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील”, असा इशारा त्यांनी दिला.
मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी म्हटलं की, कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला इराण जोरदार प्रत्युत्तर देईल. अमेरिका जाहीरपणे वाटाघाटींची भाषा करत असताना दुसरीकडे गुप्तपणे जमिनीवरील हल्ल्याची योजना आखत आहे. शत्रू एकीकडे वाटाघाटींबाबत बोलत आहे आणि दुसरीकडे जमिनीवरील आक्रमणाची योजना आखत आहे. अमेरिका १५-कलमी शांतता प्रस्तावाच्या माध्यमातूनही हेच करू पाहत आहे. कारण ते युद्धात जिंकू शकले नाहीत. पण आता आमचंही सैन्य सज्ज आहे आणि आम्ही कधीही शरणागती पत्करणार नाही’, असं मोहम्मद बागेर कलिबाफ यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इराणच्या ‘प्रेस टीव्ही’च्या हवाल्याने एएनआयने दिलं आहे.
इराण-अमेरिका संघर्ष टोकाला! ३,५०० अमेरिकन सैनिक तैनात
मध्य-पूर्वेतील इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. इराणने सौदी अरेबियातील अमेरिकन तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेने आक्रमक पवित्रा घेतला असून, या प्रदेशात ३,५०० हून अधिक अतिरिक्त सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये २,५०० मरीन सैनिकांसह सज्ज असलेले ‘युएसएस त्रिपोली’ (USS Tripoli) हे आधुनिक जहाज आता युद्धक्षेत्रात दाखल झाले आहे.
U.S. Sailors and Marines aboard USS Tripoli (LHA 7) arrived in the U.S. Central Command area of responsibility, March 27. The America-class amphibious assault ship serves as the flagship for the Tripoli Amphibious Ready Group / 31st Marine Expeditionary Unit composed of about… pic.twitter.com/JFWiPBbkd2
— U.S. Central Command (@CENTCOM) March 28, 2026
‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ आणि ११,००० लक्ष्यांवर हल्ले
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार,२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ११,००० हून अधिक लष्करी लक्ष्यांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. पेंटागॉन आता इराणमध्ये आठवडाभर चालणाऱ्या संभाव्य भू-कारवाईचा आराखडा तयार करत आहे. तथापि, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भूदल तैनात करण्यास अंतिम मंजुरी देणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे.
