Mohammad Deepak Kumar Kotdwar Uttarakhand News: उत्तराखंडच्या कोटद्वार येथे एका मुस्लीम दुकानदाराला हिंदू संघटनांकडून होणारी मारहाण रोखण्यासाठी दीपक कुमार नावाच्या जिम चालकाने पुढाकार घेतला. २६ जानेवारीला जेव्हा संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात होता. तेव्हा कोटद्वार येथील बाबा गारमेंट्स दुकानाबाहेर बजरंग दल आणि काही हिंदुत्ववादी संघटनांचे लोक जमा झाले. संबंधित दुकानाचा मालक मुस्लीम असल्याने त्याने दुकानाला दिलेले ‘बाबा’ नाव काढून टाकावे, अशी जमावाची मागणी होती. यावेळी तिथून जाणारा दीपक कुमार मध्ये पडला आणि त्याने जमावापासून मुस्लीम दुकानदाराला वाचवले.

दीपक कुमारने प्रसंगावधान राखत मुस्लीम दुकानदार वकील अहमदला वाचवले. यावेळी जमावाने त्याला तू कोण? असा प्रश्न विचारला होता. यावर मी मोहम्मद दीपक आहे, असे त्याने सांगितले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दीपक कुमार मोहम्मद दीपक या नावाने ओळखला जाऊ लागला.

मात्र पुढील काही दिवसातच सर्व काही बदलले. मोहम्मद दीपकला त्याच्या कामाचे फळ भोगावे लागत आहे.

Deepak Kumar gym owner
दीपक कुमारने मुस्लीम दुकानदाराला वाचविण्यासाठी स्वतःचे नाव मोहम्मद दीपक असल्याचे सांगितले होते.

जिमचे सदस्य झाले कमी

दीपक कुमारने वादात हस्तक्षेप केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे आणि त्याला प्रसिद्धी मिळत असल्यामुळे हिंदू संघटनांनी ३१ जानेवारी रोजी त्याच्या जिमच्या बाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. काही जण जिमच्या आत शिरून दीपक कुमारला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना बाजूला केले.

या घटनेनंतर दीपकच्या जिममधील सदस्यांनी जिममध्ये येणे बंद केले. अवघ्या काही दिवसांत त्याच्या जिममधील सदस्यांची संख्या १५० वरून १५ वर आली होती. यानंतर विधी क्षेत्रातील अनेकांनी दीपक कुमारला पाठिंबा देत त्याच्या जिममध्ये प्रवेश केला. दीपक कुमारच्या म्हणण्यानुसार आता त्याच्या जिममधील सदस्यसंख्या वाढून ७० झाली आहे.

मात्र दीपक कुमारवर टाकलेल्या सामाजिक आणि आर्थिक बहिष्काराचा मोठा परिणाम त्याच्या कुटुंबावर होत आहे. जिमसाठी द्यावे लागणारे ४० हजार रुपयांचे भाडे दीपक कुमारला आता परवडेनासे झाले आहे. तसेच त्याने स्वतःचे घर बांधण्यासाठी कर्ज घेतले होते, त्याचेही हप्ते भरणे त्याला कठीण होत आहे.

द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना दीपक कुमारने सांगितले की, चार महिन्यांपासून जिमचे भाडे थकले आहे. त्यामुळे इमारत मालकाने त्याला तात्काळ जागा खाली करण्याची नोटीस दिली आहे. “मी गेल्या काही काळापासून नियमित भाडे देऊ शकलो नाही. मात्र हळूहळू परिस्थिती सुधारत होती. आता जिममध्ये दररोज ७० लोक येत आहेत. पण मी मुस्लीम व्यक्तीच्या बाजूने उभा राहिलो, त्यामुळे इमारत मालकाला आता मला जागा द्यायची नाही”, अशी खंत दीपक कुमारने बोलून दाखवली.

सर्वोच्च न्यायालयातील वकिलांच्या एका गटाने दीपक कुमारच्या जिमचे वार्षिक सदस्यत्व घेऊन त्याला आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला. पण जिम सुरू ठेवायची असेल तर यापेक्षा जास्त सदस्यांची गरज आहे, असे त्याने सांगितले.

जानेवारीच्या वादानंतर जेव्हा पुन्हा एकदा सदस्यत्व मोहीम सुरू केली, तेव्हा वकिलांकडून आलेली रक्कम मी हप्त्यांसाठी आणि मुलांची शैक्षणिक फी भरण्यासाठी वापरली. त्यामुळे मला जिमचे भाडे भरता आले नाही. आता मला जागा खाली करण्याची धमकी देण्यात आली आहे, अशी खंत दीपकने बोलून दाखवली.

दीपक कुमारवर एक एफआयआरही दाखल झालेला आहे. तो रद्द व्हावा म्हणून त्याने मार्च महिन्यात उत्तराखंड उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर उच्च न्यायालयाने त्याला सोशल मीडियावर काही व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर करण्यापासून रोखले होते.

Rahul Gandhi meeting Mohammad Deepak Uttarakhand
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तराखंडच्या मोहम्मद दीपक या नावाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या तरूणाची भेट घेतली.

हे भित्रे लोक आहेत, राहुल गांधी काय म्हणाले?

दरम्यान दीपक कुमारला देशव्यापी प्रसिद्धी मिळाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही त्याची भेट घेऊन कोटद्वार येथे झालेला प्रसंग समजून घेतला. “दीपक कुमारने द्वेषाच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन संविधान आणि तिरंग्याचा सन्मान केला”, अशा शब्दात राहुल गांधींनी त्याचे कौतुक केले.

“लाखो भारतीयांच्या मनात सद्भाव आणि एकमेकांप्रती प्रेम वसलेले आहे. पण त्यांच्या डोक्यात थोडी भीतीही आहे. अशा सर्व लोकांना दीपकने एक धाडसाचा मार्ग दाखवला आहे. जे लोक समाजात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत, ते खरंतर भित्रे लोक आहेत. त्यांना घाबरण्याची कोणतीही गरज नाही”, असे राहुल गांधी त्यावेळी म्हणाले.

चार fir आणि दीपक कुमारच झाला आरोपी

कोटद्वारमध्ये २६ जानेवारी रोजी झालेल्या राड्यानंतर एकूण चार एफआयआर दाखल झाले. पहिला एफआयआर त्याचदिवशी बाबा गारमेंट्स दुकानाचे मालक वकील अहमद यांच्या तक्रारीनंतर दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोटद्वार येथील एका रहिवाशाने दीपक कुमार आणि त्याचा मित्र विजय रावत विरोधात दुसरा एफआयआर दाखल झाला. ३१ जानेवारी रोजी हिंदुत्ववादी कार्यकर्ते दीपक कुमारच्या हल्क जिमबाहेर जमले होते. त्यांच्या विरोधात पोलिसांनी तिसरा एफआयआर दाखल केला.

चौथा एफआयआर दीपक कुमार यांच्या तक्रारीनंतर दाखल झाला. आपल्याला मारण्यासाठी दोन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे, अशी तक्रार दीपक कुमार यांनी दिली होती. दरम्यान आपल्याला आणि कुटुंबीयांना संरक्षण मिळावे, या मागणीसाठी दीपक कुमार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली.