मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यातले भांडण चव्हाट्यावर आले तरीही त्याचे बरेच अध्याय अजूनही बाकी आहेत असेच दिसते आहे. कारण एकीकडे मोहम्मद शमीने हसीन जहाँ मिस यू म्हणत झाले गेले विसरून जाण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडे हसीन जहाँने मोहम्मद शमीविरोधात अलिपोर कोर्टात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. फक्त मोहम्मद शमीच नाही तर त्याच्या कुटुंबीयांविरोधातही हसीन जहाँने ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या दोघांमधून अजूनही विस्तव जात नसल्याचेच चित्र आहे.

मार्च महिन्यात मोहम्मद शमीला अपघात झाला. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी हसीन जहाँ त्याला भेटायला गेली होती. मात्र शमीने तिची भेट नाकारत आता कोर्टातच भेटू असे म्हणत तिला हुसकावून लावले होते. आपल्याला हुसकावून लावले असा आरोप खुद्द हसीन जहाँनेच केला होता. त्यानंतर शमी बरा झाला, त्याला रूग्णालयातून डिस्चार्जही मिळाला. ३ एप्रिलला त्याने आयपीएलसाठी सराव करतानाचा फोटोही पोस्ट केला होता. तर सोमवारीच त्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो पोस्ट करत मिस यू असे म्हटले होते. शमीच्या या भूमिकेमुळे कदाचित या दोघांमधला वाद शमेल असे वाटत असतानाच दुसऱ्याच दिवशी हसीन जहाँने अलिपोर कोर्टात शमीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे शमीच्या अडचणी वाढणार आहेत अशीच शक्यता आहे.

हसीन जहाँने तिचा पती मोहम्मद शम्मीविरोधात विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा, घरगुती हिंसाचार, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यासोबतच अनेक गंभीर आरोप केले आहेत. हसीन जहाँने शम्मी मॅच फिक्सिंगमध्येही सामील असल्याची शक्यता व्यक्त केली होती. मोहम्मद शमीने दुबईत मोहम्मद भाईच्या म्हणण्यावर पाकिस्तानी तरुणी अलिस्बाकडून पैसे घेतल्याचा आरोपही हसीन जहाँने केला होता. शमीने आपल्या भावासोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा तसंच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिने केला होता. हे सगळे प्रकरण आता कोर्टात पोहचले आहे. त्यामुळे शमीच्या अडचणींमध्ये भरच पडली आहे.