पीटीआय, ढाकाबांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतातून राजकीय टिप्पणी करणे चुकीचे असून बांगलादेश जोपर्यंत प्रत्यार्पणाची मागणी करत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांना होणारी अस्वस्थता टाळण्यासाठी हसीना यांनी मौन बाळगले पाहिजे, असे प्रतिपादन बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी केले.बांगलादेश सरकार जोपर्यंत हसीना यांना परत पाठविण्याची मागणी करत नाही, तोपर्यंत त्यांना गप्प बसावे लागेल, असे युनूस म्हणाले. भारतात राहून राजकीय टिप्पणी केल्याने दोन्ही देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधांना बाधा पोहोचू शकते, असे युनूस यांनी सांगितले. ढाका येथील अधिकृत निवासस्थानी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत युनूस यांनी भारताबरोबरच्या दृढ संबंधांना महत्त्व दिले. शेख हसीना यांना नक्कीच पुन्हा बांगलादेशमध्ये आणले जाईल. मात्र भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना आम्ही महत्त्व देतो. पण भारताने अवामी लीग वगळता इतर राजकीय पक्षांना केवळ इस्लामवादी या चष्म्यातून पाहणे बंद करावे किंवा या अपप्रचाराच्या पुढे जाणे आवश्यक आहे. शेख हसीनाशिवाय बांगलादेश अफगाणिस्तान होईल, हा अपप्रचार आहे, असे युनूस म्हणाले. हेही वाचा >>>Pooja Khedkar : “मी AIIMS मध्ये जाण्यास तयार”, बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आरोपावरून पूजा खेडकर यांची दिल्ली उच्चन्यायालयात विनंती! ‘‘बांगलादेशमध्ये सरकारविरोधात आंदोलन करताना हिंसाचार करणाऱ्या आणि निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,’’ असे विधान हसीना यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. याबाबत युनूस यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘भारतात आश्रयास असलेल्या हसीना यांनी तिथून प्रचार करू नये. त्या काही भारत दौऱ्यावर गेलेल्या नाहीत, तर जनतेने उठाव केल्यानंतर जनक्षोभ लक्षात घेऊन त्या पळून गेल्या आहेत. त्यामुळे भारतात बसून त्यांनी इथल्या घडामोडींवर सल्ले देऊ नयेत. भारत व बांगलादेश यांच्यातील संबंधांसाठी ते चांगले नाही. हसीना यांच्या विधानाबाबत आमच्या मनात अस्वस्थता आहे,’’ अशी भावना युनूस यांनी व्यक्त केली.