मोहम्मद शमी आणि हसीनच्या संसारामध्ये असणारे वाद या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वांसमोर आले होते. ज्यानंतर या दोघांमध्येही आरोप- प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळालं होतं. पण आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. पत्नी हसीनपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण सांगत भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज मोहम्मद शमीने सुरक्षारक्षकाची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे आवेदन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे संबधित विभागाला आदेश दिले आहेत.

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज शमी आणि हसीन जहाँ यांच्यामध्ये गेल्या सहा ते आठ महिन्यापासून वाद सुरू आहे. हसीन जाँने शमी विरोधात कोलकाता येथील अलीपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हसीन जहाँ वादामुळे शमीला मध्यंतरी भारतीय संघातून वगळण्यातही आले होते. त्यानंतर शमीने मोठ्या जिद्दीने संघामध्ये पुनरागमन केले आहे.

मोहम्मद शमी ज्यावेळी भारतीय संघातून बाहेर असायचा तेव्हा तो सहसपूर गावातील अलीनगर येथे राहणाऱ्या कुटुंबियासोबत राहत होता. मध्यंतरी मोहमद्द शमीने खाजगी सुरक्षा रक्षक नेमले होते. त्यानंतर काही काळानंतर त्यांना हटवण्यात आले होते.  नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यानंतर मायदेशी आल्यानंतर शमीने जिल्हाधिकारी हेमंत कुमार यांची भेट घेतली होती. तसेच मोठा भाऊ हसीब अहमदसोबत पोलिस अधिकारी डॉ. विपिन ताडा यांचीही भेट घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना आवेदन देत सुरक्षारक्षक नेमण्याची विनंती केली.

काय आहे वाद – अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप मोहम्मद शमीच्या पत्नीनं फेसबुकवरून केल्यानं कालपासूनच एकच खळबळ उडाली. शमीची पत्नी हसिन जहाँने फेसबुकवर शमीच्या काही अश्लील चॅट्स आणि काही मुलींचे फोटोही अपलोड केलं होते. यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला. नागपूर, कोलकाता, कराची, काश्मीर आणि बेंगळुरुतील तरुणीचे शमीशी संबंध आहेत, असा आरोप त्याच्या पत्नीनं फेसबुक पोस्टद्वारे केला. या पोस्टमध्ये हसिनने काही मुलींचे फोटो, मोहम्मदबरोबर त्यांनी केलेलं अश्लिल संभाषण, या मुलींचे फोन नंबरही प्रसिद्ध केले होते. या फेसबुक पोस्टनंतर मोठी खळबळ उडाली होती.