राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील त्यांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत विरोध झाला होता. त्यामुळे मोहन भागवत यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत राहिला. न्यूयॉर्कनंतर मोहन भागवत यांचा कॅनडामध्येही एक कार्यक्रम पार पडला आहे. कॅनडाच्या टोरोंटो येथे आयोजित ‘हिंदू विश्व बंधू’ या कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

टोरंटो शहरातील कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी भारताच्या एकजुटीवर, हिंदुत्वावर, भारताची मदत करण्याची परंपरा, भारताची विविधता आणि जागतिक मैत्री अशा विविध मुद्यांवर मोठं भाष्य केलं आहे. ‘भारत महासत्ता नाही, तर विश्वगुरू बनला’, असं महत्वाचं वक्तव्य यावेळी मोहन भागवत यांनी केलं. तसेच ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचा अर्थही त्यांनी सांगितला. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

मोहन भागवत यांनी काय म्हटलं?

“भारताने जगावर आपला प्रभाव ‘महासत्ता’ म्हणून कधीही निर्माण केला नाही, तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावामुळे आणि मानवतेच्या सेवेमुळे तो ‘विश्वगुरू’ बनला. भारताला कोणी महासत्ता म्हणू शकेल, पण तो तसा नव्हता. भारताने जगाची सेवा केली आणि आपल्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे तो विश्वगुरू बनला, महासत्ता नाही”, असं भाष्य मोहन भागवत यांनी केलं आहे.

“आपले पूर्वज मेक्सिकोपासून सायबेरियापर्यंत गेले. त्यांनी पायी चालत हिमालय ओलांडला. लहान बोटींतून आग्नेय आशियात प्रवास केला, पण त्यांनी कोणत्याही देशावर आक्रमण करून ताबा मिळवला नाही. त्यांनी ज्ञान, खगोलशास्त्र, आयुर्वेद आणि संस्कृतीची मूल्ये दिली. आजही जेव्हा एखादा सामान्य भारतीय कोणत्याही देशात जातो, तेव्हा तिथले लोक त्याला नमस्कार करतात”, असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

“भारताची संस्कृती आणि परंपरा ज्ञान वाटण्याची आहे. विजय मिळवण्याची किंवा धर्मांतर घडवून आणण्याची नाही. भारताने नेहमीच ज्ञान, आयुर्वेद आणि सांस्कृतिक मूल्ये दिली आहेत. सेवा आणि स्वीकारार्हतेची ही परंपरा विविधतेमध्ये दडलेल्या एकतेच्या हिंदू दृष्टिकोनातून आली आहे. जेव्हा-जेव्हा जगात कुठेही संकट आलं, मदतीची अपेक्षा केली गेली, तेव्हा भारताने मदत केली. एवढंच नाही तर मदत मागितली नसतानाही भारताने ती केली. हेच भारताचं डीएनए आहे”, असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

“वसुधैव कुटुंबकम् ही भारताची प्राचीन संकल्पना कोणालातरी मालक मानण्याऐवजी प्रत्येकाला बंधू मानण्यावर आधारित आहे. हे माझं आहे आणि ते त्याचं आहे असा विचार करणं ही संकुचित वृत्ती आहे. जे लोक मोठ्या मनाचे असतात तेच ‘वसुधैव कुटुंबकम्’वर विश्वास ठेवतात. भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे. जिथे अनेक जाती, पंथ, भाषा आणि धर्म अस्तित्वात आहेत. कारण विविधता ही नैसर्गिक बाब आहे व एकता हेच वास्तव आहे. जेव्हा मी हिंदू हा शब्द वापरतो, तेव्हा त्याची व्याख्या कोणत्याही विशिष्ट भाषेच्या, विशिष्ट उपासना पद्धतीच्या किंवा जीवनशैलीच्या आधारे केली जाऊ शकत नाही. हिंदू सर्वांचा स्वीकार करतात आणि सर्वांचा आदर करतात”, असं मोहन भागवत म्हणाले आहेत.