Mohan Bhagwat Madison Square Garden Event: अमेरिकेत मॅडिओन स्क्वेअर गार्डन येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला न्यू यॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी विरोध दर्शवला आहे. यानंतर आता या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने सुरक्षा अडव्हायजरी जारी केली आहे. “महापौर झोहरान ममदानी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींसह सर्व न्यू यॉर्कवासीयांच्या सुरक्षेची हमी देण्याची आपली शपथ पाळावी,” असे आवाहन फाऊंडेशनने केले आहे.
हिंदू अमेरिकन फाऊंडेशनकडून अडव्हायजरी
हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने याबाबत एक पोस्ट एक्सवर केली आहे. “कम्युनिटी अडव्हायजरी अलर्ट”, असे म्हणत, न्यू यॉर्क सिटीमधील मॅडिओन स्क्वेअर गार्डन येथील युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर अडव्हायजरी जारी करत असल्याचे म्हटले आहे. फाऊंडेशनने २९ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी हा सल्ला जारी केला असून समुदायाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सतर्क राहण्याचे आवाहन
“सतर्क राहा, परिस्थितीची जाणीव ठेवा आणि संवाद सौहार्दपूर्ण ठेवा. या कार्यक्रमापूर्वी, हिंदू अमेरिकन लोकांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी हा उत्सव उद्ध्वस्त करण्याचा आणि रद्द करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही झोहरान ममदानी यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाच्या उपस्थितांसह सर्व न्यू यॉर्कवासीयांचे रक्षण करण्याच्या आपल्या कर्तव्याचे पालन करावे”, असे हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने पोस्टमध्ये म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोग काय म्हणाले?
दरम्यान, भारतातील धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती खालावत चालली आहे. अमेरिकन सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य व भारतीय अधिकाऱ्यांवर निर्बंध घालण्याचा विचार करावा, असे अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने म्हटले आहे. “धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करण्यात सहभागी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांवर आणि भारतीय अधिकाऱ्यांवर निर्बंध घालण्याचा विचार करावा. तसेच मोहन भागवत यांना जारी केलेला व्हिसा रद्द करून त्यांना भविष्यात अमेरिकेत प्रवेशास अपात्र ठरवावे, अशी आम्ही अमेरिकन सरकारला विनंती करतो”, असे अध्यक्ष आसिफ महमूद यांनी म्हटले आहे.
महापौर ममदानींचा विरोध
दुसरीकडे ममदानी यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना भागवत यांच्या उपस्थितीत मॅडिओन स्क्वेअर गार्डन येथे होणाऱ्या नियोजित कार्यक्रमाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, खासगी कार्यक्रम रद्द करण्याचे पालिकेच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
